शालेय पोषण आहारापासून लाखो विद्यार्थी वंचित

मोठ्यांच्या वादात छोट्यांचे मात्र हाल
शालेय पोषण आहारापासून लाखो विद्यार्थी वंचित
संग्रहित

अहमदनगर (प्रतिनिधी ) - जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणारे लाखो विद्यार्थी गेल्या चार महिन्यांपासून शालेय पोषण आहारापासून वंचित असून करोनामुळे दिला जाणारा कोरडा शिधा सुद्धा त्यांना मिळत नाही. जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांच्या वादामध्ये ही योजना अडकल्याने मोठ्यांच्या वादात छोट्यांचे मात्र हाल होत असल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिकृत सूत्रानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शासनामार्फत शालेय पोषण आहार खिचडीचे रूपाने दिला जातो. गेले वर्षभर करोनामुळे शाळा बंद असल्याने खिचडी ऐवजी कोरडा शिधा पालकांपर्यंत पोहोचवला जातो. परंतु तांदूळ व इतर धान्य पुरवठा करण्याचा ठेका ज्या पुरवठादाराला दिला होता त्याचा करार संपल्याने नवीन करार अद्याप झालेला नाही. कराराच्या निविदा निघाल्या. मात्र कोट्यवधी रुपयांचा हा धान्य पुरवठ्याचा ठेका तुला की मला या वादामध्ये सापडला आहे.

राज्यात इतर सर्व जिल्ह्यांमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र मुंबई आणि अहमदनगर जिल्ह्यातील पुरवठादार यांचे करार संपल्याने नवीन करार करण्याबाबत निविदा निघाल्या. मुंबईचा करार फायनल झाला. परंतु नगर जिल्ह्याचा मात्र अद्यापही अंतिम होत नसल्याने गेली चार महिने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून शिकणारे लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या शालेय पोषण आहाराच्या धान्यापासून वंचित आहेत. मागच्या वर्षी हा ठेका उत्तरेतील एका मोठ्या पुढार्‍याच्या घरच्या माणसाला देण्यात आला होता. या मातब्बर पुढार्‍याच्या नावाखाली पुरवठादाराने अतिशय निकृष्ट प्रतीचे धान्य शाळांना पुरवले.

दिलेली मुगडाळ आणि हरभरा यांचा दर्जा अत्यंत सुमार होता. परंतु मोठ्याच्या कोणी नादी लागायचं या प्रश्‍नामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणा गपगार होती. शाळांना दिले जाणारे धान्य वजनापेक्षा खूप कमी होतं. एखाद्या शाळेने तक्रार केल्यास मात्र मोठ्याकडे बोट दाखवले जात होते. त्यामुळे सर्वांनीच तेरी भी चूप आणि मेरी भी चुप हे धोरण अवलंबिले होते. गेल्या नोव्हेंबरमध्ये या पुरवठादाराचा ठेका संपुष्टात आल्यानंतर पुन्हा नवीन निविदा काढण्यात आल्या. त्यात पुन्हा याच पुरवठादाराला ठेका मिळावा म्हणून वजनदार नेत्यांनी आपले वजन खर्ची घातले. परंतु आता राज्यात सत्तांतर झाले असल्याने दुसरा एक नेता या पुरवठादाराला बदलण्यासाठी सक्रिय झालेला आहे. या दोघांच्या वादात अनधान्य पुरवठ्याचा ठेका सापडल्याने मागील चार महिन्यापासून शाळांना शालेय पोषण आहाराचा कोरडा शिधा मिळालेला नाही.

सध्या सर्वत्र करोनामुळे लॉक डाऊन चालू आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आणि ग्रामीण भागातून गोरगरिबांची मुलं शिक्षण घेत आहेत . मोलमजुरी करणार्‍या लोकांना शालेय पोषण आहाराचा मिळणारा तांदूळ आणि डाळ हा एक मोठा आधार आहे. परंतु चार महिने तोच मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना उपासमार करण्याची वेळ आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेमध्ये चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी सुद्धा काही बोलायला तयार नाहीत. पुण्याला शिक्षण उपसंचालक व शिक्षण संचालक यांच्या कार्यालयात सुद्धा याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. परंतु प्राप्त झालेल्या अधिकृत सूत्रानुसार जिल्ह्याचा कोट्यवधी रुपयांचा पुरवठ्याचा ठेका आपल्या माणसाला मिळावा म्हणून हे दोन मातब्बर नेते भांडत असल्याने त्यांच्या वादात हा ठेका सापडला आहे.

प्राप्त माहितीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला पाच ते दहा किलोपर्यंत धान्य तांदूळ व डाळीचे रुपाने मिळणार आहे. मागील वेळी तांदळा बरोबर मूग डाळ, मटकी आणि हरभरा हे कडधान्य देण्यात आले होते. यावेळी तांदळा बरोबर मसूरडाळ देण्याचे नियोजन असल्याचे समजते. देण्यात येणारी डाळ ही मागील मुगडाळी सारखीच सुमार दर्जाची असणार की दर्जेदार असणार याबाबतही साशंकता आहे. धान्याचे लावले जाणारे दर आणि मिळणारे धान्य यांचे विचार केल्यास या योजनेमध्ये मोठे गौडबंगाल असल्याची चर्चा दबक्या आवाजात जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे आता हा ठेका कधी अंतिम होणार आणि जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना खिचडीचे दोन घास कोरडा शिधाच्या रूपाने कधी खायला मिळणार याची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com