बळीराजाने पाठ फिरवल्याने बाजरीला येणार अच्छे दिन

सोयाबीनचे बंपर पीक तर 20 टक्के मका आणि अवघी 5 टक्के बाजरीची पेर
बळीराजाने पाठ फिरवल्याने बाजरीला येणार अच्छे दिन

लोणी |वार्ताहर| Loni

काही वर्षांपूर्वी जिरायती भागाचे मुख्य पीक म्हणून ओळख निर्माण केलेल्या बाजरीकडे आता बळीराजाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात आणि राज्याच्या बहुतांशी जिरायती भागात बाजरीची अवघी पाच टक्के पेरणी झाली आहे तर सर्वाधिक पंच्याहत्तर टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे बंपर पीक उभे आहे. मका पिकालाही बळीराजाची पसंती वाढत असून जवळपास वीस टक्के क्षेत्रावर हे पीक उभे असल्याचे दिसून येते. परिणामी कष्टकर्‍यांचे धान्य म्हणून ओळखली जाणारी बाजरी आता इतर राज्यांतून आणून खावी लागणार असल्याने बाजरी उत्पादकांना अच्छे दिन येणार आहेत.

फक्त पावसावर येणारे आणि कमी उत्पादन खर्चाचे खरिपातील बाजरी हे पीक आता जिल्ह्यातून हद्दपार होते की काय असे चित्र दिसत आहे. जिरायती भागातील शेतकरी बाजरीचे पीक प्राधान्याने घेत असत पण आता त्यापेक्षा अधिक नफा देणारे सोयाबीन आणि मका हे दोन पर्याय शेतकर्‍यांना मिळाले आहेत. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून या पिकांना अपेक्षेपेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकर्‍याला खात्री वाटत आहे. बाजरी पिकाला अनेक वर्षांपासून मिळणार्‍या भावात फारशी वाढ झालेली नाही.

शिवाय सोंगणी आणि काढणीसाठी मजूर फारसे धजावत नसल्याने शेतकर्‍यांना त्याचा त्रासही सहन करावा लागला. बाजरीचे नवीन संशोधित अनेक वाण बाजारात आले आणि एकरी उत्पादन वाढही झाली तरी बळीराजा या पिकापासून दूर गेल्याचे दिसते. यामागे खरिपातील इतर पिकातून मिळणारे उत्पन्न आणि आर्थिक गणित आहे. सोयाबीनच्या भुशाला चांगली मागणी आहे. तर मका पिकाचा मोठा वापर मुरघास बनवण्यासाठी केला जात असल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही कायमस्वरूपी सुटल्याने पशुपालक समाधानी आहेत.

बाजरीचे धान्य खाणारा मोठा वर्ग म्हणजे कष्टकरी. शेतात आणि इतर ठिकाणी शारीरिक मेहनतीचे काम करणारे लोक बाजरी धान्याला प्राधान्य देतात तर मांसाहारी जेवणासाठी बाजरीची भाकरी अनेकांच्या आवडीचा विषय आहे. अलीकडे अनेक हॉटेलमध्ये चुलीवरची बाजरीची भाकर मिळेल असे फलक लावल्याचे दिसून येते. भाजरी धान्याच्या भाकरीने लवकर भूक लागत नाही. ज्वारी आणि गहू धान्याचे सेवन करणारे दिवसभरात अधूनमधून काही ना काही खाताना दिसतात. त्यातच बाजरी हे धान्य उष्ण असल्याने पावसाळा आणि हिवाळा ऋतूत त्याचा अधिक वापर केला जातो. गरीब, कष्टकरी लोकांना इतर धान्याच्या तुलनेत बाजरी स्वस्त मिळत असल्याने ती खाण्यास परवडते हा महत्त्वाचा भाग आहे.

मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजरीचे खरिपातील पीक हळूहळू कमी होत गेले. यावर्षी तर अवघी पाच टक्के बाजरीची पेरणी झाली आहे. बाजरीच्या ठिकाणचे सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनने व्यापल्याचे दिसून येते. सोयाबीनला दोन वर्षांपासून सहा हजार ते तेरा हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाल्याने उत्पादकांना त्यातून मोठा आर्थिक फायदा झाला. त्यामुळेच शेतकरी या पिकाकडे वळला असून जमिनीचा सेंद्रिय कर्ब सोयाबीनमुळे वाढत असल्याने जमिनीची उत्पादक क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. सोयाबीनसाठी रासायनिक खते आणि औषधे यांचा वापर करावा लागत असल्याने कृषी सेवा केंद्र चालकांचीही उलाढाल चांगलीच वाढली आहे. सोयाबीनची सोंगणी आणि काढणीचे दर बाजारीपेक्षा अधिक असल्याने शेतमजुरांची दिवाळी सुद्धा जोरात होत आहे.

शेतीचे अर्थकारण नक्कीच महत्त्वाचे आहे. ज्या पिकात अधिक फायदा ते शेतकरी घेणारच. पण खाणारांपुढे मात्र मोठी समस्या निर्माण होणार आहे. राज्यातील बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घटल्याने मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून बाजरी आणून व्यापारी तिची विक्री करतील. इथले उत्पादन घातल्याने बाहेरची बाजरी महागड्या भावात घ्यावी लागणार यात शंकाच नाही. बाजरीला अच्छे दिन येतील पण खाणारांचे खिसे मात्र रिकामे होतील. शिवाय ‘गावरान’ पाहिजे म्हणायची सोयही राहणार नाही.

पक्षांचे स्थलांतर होऊ शकते !

खरीप हंगामात पक्षांचे पोट भरणारे बाजरी हे मुख्य पीक. मात्र तेच मोठ्या प्रमाणात घटल्याने पक्षांना पोट भरण्यासाठी स्थलांतर करावे लागू शकते. सोयाबीन, मका या पिकांवर पक्षी आपल्या अन्नाची व्यवस्था करू शकणार नाहीत. या पिकांवर किटकनाशकांचा फवारणी करण्यात येत असल्याने अळ्या आणि विविध प्रकारचे किटकही त्यांना खाण्यासाठी मिळणार नाहीत. त्याचबरोबर बाजरी पिकामध्ये खरीप हंगामात शेतकरी मठ, मूग ही पिकेही घेत होते. बाजरी नसल्याने ही पिकेही नाहीत. त्यामुळे त्यांचे उत्पादन घटणार असून त्यांची दरवाढ होऊ शकते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com