मिल्लतनगरच्या नागरी समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष

मिल्लतनगरच्या नागरी समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष

प्रशासनाविरुद्ध नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील मिल्लतनगर परिसरातील नागरिक विविध समस्यांनी हैराण झाले असून या प्रश्नांकडे नगरपालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. रस्ते, पाणी, वीज या प्रमुख गरजांबाबत या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.

अलीकडच्या काळात मिल्लतनगर परिसरात नागरी वस्तीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दहा वर्षापूर्वी लोकवस्ती विरळ असल्याने परिसरात टाकलेली जलवाहिनी त्यावेळी पुरेशी होती. मात्र आता वैदूवाडा पुलापासून तलावाकडे जाणारी मुख्य जलवाहिनी सहा इंची असून तिला मिल्लतनगरच्या विविध भागात जोड देण्यात आल्यामुळे व उप जलवाहिन्या जोडल्या गेल्याने परिसरातील अनेक भागात सध्या पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. चार महिने नागरिक पाणीटंचाईला तोंड देत आहेत. शेजारील वैदू वाड्यामध्ये दिवसातून पाच वेळा पाणी येते व हजारो लिटर पाणी वाया जाते.

ही परिस्थिती एकीकडे तर दुसरीकडे मिल्लतनगरमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. मध्यंतरी पाईपलाईनमध्ये दगड अडकल्याने या भागात पाणीच येत नव्हते. पालिकेने हा प्रश्न सोडवला मात्र यातून नवीन प्रश्न निर्माण झाला. जोडणी करताना चुकीची जोडणी झाल्याने या भागातील सेक्टर 2, 3, 4 व 5 मध्ये अत्यंत कमी पाणी पुरवठा होतो. यासंदर्भात नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी महिन्यापासून या भागात फिरकले नाही. शहरातील इतर भागांमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिकेने बोर कनेक्शनची व्यवस्था केली आहे.

त्याच पद्धतीने या परिसरात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बोअर कनेक्शन घेऊन त्याची स्वतंत्र पाईपलाईन टाकावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे या भागात विजेचीही समस्या निर्माण झाली आहे. डिपींची संख्या कमी असल्याने विजेचा दाब कमी मिळतो. त्यामुळे घरातील पंखे व इतर विजेची उपकरणे चालत नाहीत. लाईट कधी पण जाते, कधी पण येते. महावितरणच्या अधिकार्‍याचे याकडे लक्ष वेधले. परंतु हा प्रश्न वरिष्ठ पातळीचा असल्याचे सांगून त्यांनी हात झटकले.

या भागामध्ये पाईपलाईनच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने रस्त्यांवर मातीचे ढीग साचले आहेत. तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. याबाबत मागील महिन्यात नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते. श्रीरामनवमी झाल्यानंतर या प्रश्नाकडे लक्ष देऊ, असे आश्वासन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com