दुधाच्या टँकरखाली दबल्याने कामगाराचा मृत्यू

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
दुधाच्या टँकरखाली दबल्याने कामगाराचा मृत्यू

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

दुधाच्या टँकरखाली दबून दूध संघाच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजे सुमारास संगमनेर दूध संघ परिसरात घडली. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर दूध संघाच्या दूध खाली करण्याच्या प्लॅट फार्मवर टँकर चालक मच्छिंद्र रामनाथ जाधव हा त्याच्या ताब्यातील एम. एच. 17 टी 5449 या क्रमांकाचा टँकर लावत होता. यावेळी टँकरच्या पाठीमागे संदीप साहेबराव चव्हाण हा कर्मचारी पाईप धरुन उभा होता. टँकर चालकाच्या हे लक्षात आले नाही. त्याने आपला टँकर हलगर्जीपणाने मागे घेतला. यामुळे संदीप प्लॅट फार्म व ट्रॅकरच्या मध्ये दाबला गेला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मयत कामगार हा सुमारे दहा वर्षापासून संगमनेर दूध संघामध्ये काम करत होता.

जखमी संदीप याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकूल वातावरणात मयतावर त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयताचा भाऊ पप्पू साहेबराव चव्हाण (वय 30, रा. जोर्वे) याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दूध संघातील टँकर चालक मच्छिंद्र रामनाथ जाधव (रा. वरुडी पठार, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अ, 279, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फटांगरे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com