दुध
दुध
सार्वमत

दुधाला तातडीने दरवाढ किंवा अनुदान द्या

जिल्ह्यातील 50 हजार दूध उत्पादक करणार राज्य शासनाला ई-मेलद्वारे मागणीअन्यथा टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा इशारा

Arvind Arkhade

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali Pravara

दुधाचे प्रतिलिटर 10 ते 15 रुपये पडलेले दर शासनाने त्वरीत वाढवून द्यावेत किंवा दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या बँकखाती प्रतिलिटर 10 ते 15 रुपये अनुदान जमा करावे. या मागणीसाठी जिल्ह्यातील 50 हजार दूध उत्पादक शेतकरी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुग्ध विकासमंत्री व राज्याचे मुख्यसचिव यांना ई-मेल पाठविणार असल्याचा निर्णय अहमदनगर जिल्हा डेअरी प्लांट फेडरेशनच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी दूध दरवाढ संदर्भात बोलविण्यात आलेल्या जिल्हा फेडरेशनच्या बैठकीला फेडरेशनचे 153 प्लांटचे सदस्य व जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत करोना महामारी सुरू होण्यापूर्वी दुधाचे दर 35 ते 37 रुपये प्रतिलिटर होते. करोना महामारी सुरू झाल्या नंतर अतिरिक्त दुधाच्या नावाखाली हे दर 10 ते 15 रुपये प्रतिलिटरने कमी करण्यात आले आहेत.

मुख्य म्हणजे दूध उत्पादकांचे दर कमी केल्यानंतर खरेदीदारांचे दर देखील कमी व्हायला पाहिजे होते. परंतु तसे काही झालेले दिसत नाही. आजही शहरी भागात दुधाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून कुठल्याही प्रकारे दर कमी झाले नाहीत. मग मधले पैसे कोणाच्या खिशात जातात? असा प्रश्न उपस्थित दूध उत्पादकांनी केला. पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. तर दुसर्‍या बाजूला दुधाचे दर दिवसेंदिवस पडत चालले आहेत. त्यामुळे हा व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे.

पशुखाद्याचे दर व दुधाचे दर बघता हातात काहीच शिल्लक राहत नाही. अशी वाईट अवस्था दूध उत्पादकांची झाली आहे. शासन म्हणते, दुधाचे दर पडू नये म्हणून शासनाने दीड कोटी लिटरची दूध पावडर करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने दूध खरेदी सुरू केली आहे. अशी घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात मात्र, तशी अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

हा सर्व फार्स शासनाने बंद करून सरळसरळ दूध उत्पादकांच्या बँकखाती वरीलप्रमाणे अनुदान जमा करावे. अन्यथा येथून पुढे कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन हाती घेण्यात येईल. यावेळी होणार्‍या नुकसानीची जबाबदारी शासनावर राहील, असा निर्णय घेण्यात आला.

यावेळी फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व दूध उत्पादकांनी आंदोलनाबाबत सांगितले, आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील मंत्री व आमदारांच्या निवासस्थाना समोर संतप्त दूध उत्पादक दूध ओतून दूध दर कपातीचा निषेध व्यक्त करणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात शासकीय कार्यालयासमोर म्हणजेच तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालया समोर दूध ओतून निषेध व्यक्त करण्यात येईल. तरी देखील शासनाला जाग आली नाही तर मात्र, अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व दुग्ध विकासमंत्री यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून जिल्ह्यात असलेल्या प्रत्येक महामार्गावर सुरक्षित अंतर ठेऊन करोना बाबतचे सर्व नियम पाळून तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला, असल्याचे सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com