अकोलेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन
सार्वमत

अकोलेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव मिळालाच पाहिजे. यासाठी शासनाने 10 रुपये प्रति लिटर अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात तातडीने वर्ग करावे या प्रमुख मागणीसाठी काल सोमवारी सकाळी अकोले येथून दुग्धभिषेक करून आंदोलनास सुरवात झाली. या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरत जाणार असून अकोले तालुक्यातही उद्या 21 जुलै पासून तालुकाभर दुग्धभिषेक आंदोलन हाती घेण्यात आले आहे.

यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, किसान सभेचे प्रदेश सचिव डॉ. अजित नवले, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेशराव नवले, अध्यक्ष सुरेश नवले, भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. शांताराम वाळुंज, लक्ष्मण नवले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संयोजक डॉ. संदीप कडलग, सोमनाथ नवले, अगस्ती कारखान्याचे संचालक सुरेश गडाख, बाळासाहेब ताजणे, सिद्धेश्वर दूध संस्थेचे अध्यक्ष संदीप शेटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष, नगरसेवक सचिन शेटे, रोहिदास धुमाळ, कॉ. खंडू वाकचौरे, स्वप्नील नवले, गणेश ताजणे, शुभम आंबरे आदी दूध उत्पादक संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार असल्याचे महेश नवले यांनी म्हटले आहे. कोल्हापूर व सांगलीतही आंदोलनाची सुरुवात झाली आल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले. तालुक्यात ठिकठिकाणी शेतकरी नेते जाऊन या दुग्धभिषेक आंदोलनात जबाबदारीने सहभागी होणार आहेत. दूध संकलन केंद्रावर दूध उत्पादक शेतकर्‍यांसह दुग्धभिषेक आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन दूध उत्पादक संघर्ष समितीचे वतीने यावेळी करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com