रिव्हर्स रेट वाढवून दूध खरेदी दर पाडण्यास सरकारची मूकसंमती आहे काय?

किसान सभेचा सवाल
रिव्हर्स रेट वाढवून दूध खरेदी दर पाडण्यास सरकारची मूकसंमती आहे काय?

अकोले |प्रतिनिधी| Akole

दुधाची फॅट व एस.एन.एफ.चे रिव्हर्स दर वाढवून शेतकर्‍यांना मिळत होते त्यापेक्षाही कमी दर मिळतील अशी व्यवस्था सरकारने केली आहे. सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून रिव्हर्स रेट पूर्ववत करावेत व शेतकर्‍यांना किमान 35 रुपये दर मिळतील याची व्यवस्था करावी, अशी राज्यभर मागणी होऊनही राज्य सरकार याबाबत मौन बाळगून आहे. सरकारचे हे मौन शेतकर्‍यांची लुट सुरु ठेवण्यासाठीची मूक संमती आहे काय ? असा सवाल या निमित्ताने शेतकर्‍यांच्या वतीने किसान सभेने उपस्थित केला आहे.

गायीच्या दुधाला प्रति लिटर किमान 35 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, राज्यातील विविध शेतकरी संघटना व शेतकरी नेत्यांनी केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने हस्तक्षेप करत दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा असे निर्देश दिले. मात्र सरकारच्या अशा हस्तक्षेपाचा पूर्वानुभव पाहता असे निर्देश, पळवाटा काढून धाब्यावर बसविले जातील, अशीच शंका होती. प्रत्यक्षात तसेच घडले आहे. खासगी व सहकारी दूध संघांनी संगनमत करून 3.5 /8.5 गुणवत्तेच्या दुधाला 34 रुपये दर जाहीर केले, मात्र फॅट व एस.एन.एफ.चे रिव्हर्स दर वाढवून शेतकर्‍यांना मिळत होते त्यापेक्षाही कमी दर मिळतील अशी व्यवस्था केली आहे.

शेतकर्‍यांना दूध संघांनी व दूध कंपन्यांनी गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा यासाठी शासन आदेश काढण्यापूर्वी फॅटचा रिव्हर्स रेट प्रति कमी होणार्‍या 1 पॅाइंटसाठी 20 पैसे होता. आता तो सरळ 50 पैसे करण्यात आला आहे. एस.एन.एफ.चा रिव्हर्स रेट प्रति कमी होणार्‍या 1 पॅाइंटसाठी 30 पैसे होता, आता तो 1 रुपया करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना यामुळे फक्त 25 ते 30 रुपये दर मिळत आहेत. महाराष्ट्रात पशुधनाचे संकरीकरण करताना वापरण्यात आलेल्या पद्धती व बिजामुळे बहुतांश संकरीत गायींच्या दुधाला कमी फॅट व एस.एन.एफ. बसते. शिवाय सध्या पावसाळा असल्याने व हिरवा चारा उपलब्ध असल्यानेही दुधाचे फॅट व एस.एन.एफ. कमी झाले आहे. परिणामी रिव्हर्स रेट वाढविण्यात आल्याने दूध व्यवसाय तोट्यात गेला आहे. रिव्हर्स पॅाइंटमुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची तूट सोसावी लागत आहे.

सरकारने दूधदर वाढविण्यासोबतच पशुखाद्याचे दर 25 टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र हे दर कमी करण्याऐवजी 1 ऑगस्टपासून 5 टक्क्यांनी वाढले आहेत. शासनाने दूध उत्पादकांच्या या प्रश्नांची तातडीने दखल द्यावी. गायीच्या दुधाला 34 रुपये दर देत असताना रिव्हर्स रेट पूर्ववत करत फॅट रिव्हर्स रेट 20 पैसे व एस.एन.एफ. रिव्हर्स रेट 30 पैसे करावेत व पशु खाद्याचे दर कमी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, अशोकराव ढगे, जोतीराम जाधव, दादा गाढवे, राजकुमार झोरी, श्रीकांत कारे, रामनाथ वदक, दीपक वाळे, मंगेश कान्होरे, दीपक पानसरे, सुहास रंधे, अमोल गोर्डे आदींनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com