दूध उत्पादकांचे आंदोलन होणारच
सार्वमत

दूध उत्पादकांचे आंदोलन होणारच

मुख्यमंत्र्यांना पत्र : 13 ते 18 ऑगस्टपर्यंत ‘लेटर टू सीएम’

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे दूध दरवाढीच्या मागणीसाठी लेटर टू सीएम हे आंदोलन 13 ऑगस्ट पासून 18 ऑगस्ट पर्यंत राज्यभर करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी सोमवारी राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाल्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती पत्रकारांना देत असताना सांगितले.

देठे पाटील म्हणाले की, मार्च महिन्यापासून राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने दुधाच्या मागणीत कमालीची घट झाल्याने दूधदरात मोठी घसरण झालेली आहे. याबाबत राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी वेळोवेळी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निवेदने दिली.

तसेच राज्यभर 1 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलने देखील केली परंतु तरी देखील राज्य सरकार बधत नसल्याने सोमवारी सकाळी 11.00 वा. राज्यातील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत, किसान सभेचे राज्य राज्यसरचिटणीस डॉ. अजित नवले, शेतकरी नेते अनिल देठे पाटील, रोहिदास धुमाळ, मधुकर म्हसे, धनंजय धोरडे, महेश नवले, सुरेश नवले आदी शेतकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली.

बैठकीत राज्यात 13 ऑगस्ट पासून 18 ऑगस्टपर्यंत लेटर टू सीएम हे आंदोलन करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.या आंदोलनादरम्यान राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आपापल्या गायींच्या गोठ्यातूनच मोठ्या प्रमाणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र तसेच ई-मेल पाठवून राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणार असून दूध उत्पादक शेतकर्‍यांना करोनाच्या महासंकटात आधार देण्यासाठी दुधाला प्रतिलीटर 30 रुपये दर देण्याची मागणी करणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक स्वरूपाचे व संख्येचे आंदोलन करण्यास मर्यादा येत असल्याने राज्य सरकार जाणीवपूर्वक दूध दराबाबतचा तिढा सोडवण्यासाठी विलंब करत असल्यानेच दूध उत्पादक शेतकर्‍यांना आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागत आहे.

आतापर्यंत राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु राज्य सरकार जर शेतकर्‍यांच्या संयमाची परीक्षा घेणार असेल तर ते चुकीचे आहे. या आंदोलनानंतर राज्य सरकारने दूध दरवाढीच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही तर मात्र संयमाने व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारा दूध उत्पादक शेतकरी आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही,असा इशाराही त्यांनी या दरम्यान दिला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com