दूध उत्पादकांना प्रतिलिटर 10 रुपये अनुदानाची मागणी

दूध उत्पादकांना प्रतिलिटर 10 रुपये अनुदानाची मागणी

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा दूध व्यवसाय सध्या अत्यंत अडचणीत सापडला आहे. सध्या 22 रुपये दराने दुधाची खरेदी होत असल्याने या व्यवसायात अजिबात पडतळ बसत नसल्याने दूध उत्पादकांना पशुपालन करणे अत्यंत अवघड झाले आहे.

आर्थिक मंदी व करोना महामारीचे संकट यामध्ये दूध व्यवसाय शेवटच्या घटका मोजू लागला आहे. गेल्या पाच महिन्यात पशुखाद्यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती व करोना लॉकडाऊनमुळे सतत पडणारे दूधाचे दर, यामुळे या व्यवसायाचे विदारक चित्र दिसत आहे. यातून दूध उत्पादकांना वाचविण्यासाठी शासनाने तातडीने प्रतिलिटर 10 रुपये अनुदान दूध उत्पादकांना देण्यात यावे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.

ताजा पैसा मिळणारा म्हणून ओळख असलेल्या दूध व्यवसाय सध्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पुरता काळवंडला आहे. सध्या करोना महामारीच्या कचाट्यात दूध व्यवसाय सुध्दा नासला आहे. पाच महिन्यापूर्वी 33 रुपयांपर्यंत गेलेला दुधाचा दर करोना महामारीमुळे लॉकडाऊन लागताच दहा रुपयांनी खाली आला आहे. याउलट ग्राहकांना मात्र, 44 रुपये प्रतिलिटर दूध विकत घ्यावे लागते आहे. मग मधली मलई कोण खातयं ? असा सवाल दूध उत्पादकांनी केला आहे. दूध खरेदीदारांना प्रतिलिटर दहा रुपये तर प्रक्रिया खर्च येत नाही. मग दुधाचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात पडण्याचे गौडबंगाल काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. डिसेंबर 2020 ला हजार, अकराशे रुपयांला मिळणारे 50 किलोचे सरकीपेंडचे पोते आता चक्क 1800 रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. यामुळे पशूधन कसं संभाळावं? हा गंभीर प्रश्न समोर आहे.

करोनामुळे जनावराचे बाजार बंद असल्याने ते विकता येत नाहीत. त्यामुळे जनावरं अंगावर पोसावे लागत आहेत. उन्हाळ्यात हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. जो मिळतो त्याचे दर गगनाला भिडले आहेत. या दुहेरी संकटाला दूध उत्पादक शेतकरी सामोरे जात आहेत. शेतकर्‍यांच्या दूध प्रश्नांवर सरकार तसेच विरोधी पक्ष हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेऊन चूप आहे. सरकार लक्ष देत नाही आणि विरोधी पक्ष फक्त फोटोपुरते आंदोलन करतो. त्यामुळे आपली घुसमट कोणाकडे मांडावी? हाच प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे.

राजकीय नेत्यांना दूधदरकपात बाबत गांभीर्य नसण्याचे कारण म्हणजे राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ राजकीय नेत्यांच्या वर्चस्वाखाली आहेत. दूध उत्पादक शेतकरी व दूध ग्राहकांची लूट हा एकमेव अजेंडा या लोकांचा आहे. शेतकर्‍यांकडून 22 रुपये दराने गाईचे दूध खरेदी करून ग्राहकांना 44 रुपये म्हणजे तब्बल लिटरमागे 22 रुपयांची नफारुपी मलई मधले दलाल खात आहेत. मात्र, हे सर्व न समजण्याइतके शासन दूधखुळे नक्कीच नाही. हा व्यवसाय जर वाचवयाचा असेल तर शासनाने पशूखाद्याचे दर कमी करुन दूध उत्पादकांना अनुदान देण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com