दूध उत्पादक शेतकर्‍यांना 34 रुपये दर - ना. विखे

दूध उत्पादक शेतकर्‍यांना 34 रुपये दर - ना. विखे

आश्वी |वार्ताहर| Ashwi

दूध उत्पादक शेतकर्‍यांना 34 रुपये दर देण्याबाबत दूध दर निश्चित समितीने केलेली शिफारस राज्य सरकारने स्विकारली असून, राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघानी दूध उत्पादक शेतकर्‍यांना 34 रुपयेदर देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करुन हे सरकार दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या महाजनसंपर्क अभियानात मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित शेतकरी, ग्रामस्थ आणि युवकांशी संवाद साधून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहीती दिली. याप्रसंगी भाऊसाहेब इंगळे, सरपंच सौ. प्रिती दिघे, प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, शरद थोरात, शिवाजीराव कोल्हे, राहुल दिघे, गोकूळ दिघे, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धिरज मांढरे, गटविकास अधिकारी नागणे, उपविभागीय कृषी आधिकारी विलास गायकवाड, यांच्यासह विविध विभागांचे आधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी जोर्वे गावातील नागरीकांना महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या योजनांच्या माहिती पत्रकांचे वाटप केले.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अडचणींचा सामना करणार्‍या दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याची भूमिका राज्य सरकारची होती. यासाठी राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेवून समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 34 रुपये दर देण्याची शिफारस केली. त्यानुसार राज्य सरकारने आता गाईच्या दुधाकरिता किमान 34 रुपये प्रतिलिटर दर देण्याचा शासन आदेश काढला असून, याची अंमलबजावणी करण्याबाबतही सुचित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. दर 3 महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करण्याबाबतही या आदेशात सूचित करण्यात आले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

पशुखाद्य कंपन्यांना देखील खाद्याचे भाव कमी करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पशु खाद्याबाबत सरकारने आता गांभिर्याने काही निर्णय करण्याची भूमिका घेतली आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक थांबविण्यासाठी पशुखाद्यांमध्ये कोणते घटक आहेत याची सविस्तर माहीती गोण्यांवर छापण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या असून, याची अंमलबजावणी न करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या इशारा त्यांनी दिला. दूध भेसळ रोखण्यासाठीही कठोर पाऊले आता शासनाने टाकली असून, यासाठी पोलिस, पशुसंवर्ध विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागातील आधिकार्‍यांची जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. दूध भेसळ करणार्‍यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील वाळू धोरणातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न आहे. परंतु धोरणच यशस्वी होऊ द्यायचे नाही यासाठी प्रयत्न करणार्‍यांचे मनसुबे सरकार कदापीही यशस्वी होऊ देणार नाही असे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले, आता भंडारदरा धरणापासून ते ओझरपर्यंत प्रवरा नदीपात्राची नोंद ही कालवा म्हणून होती तर यापूर्वी त्यातून वाळू उपसा कसा झाला याची चौकशी प्रांताधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी करावी असे सुचित करून आता दिवसा वाळू मिळत आहे याची पोटदुखी अनेकांना झाली आहे, तेच आता नदीपात्रातून वाळू उपसा होऊ देणार नाही म्हणून पुढाकार घेऊ लागले आहेत याचे आश्चर्य वाटते. यापूर्वी वाळू उपशाला विरोध करणार्‍यांवर या तालुक्यात गुन्हे दाखल झाले परंतु माफीया मात्र मोकाटच फिरत होते ही परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न आपण वाळू धोरणातून केला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com