
पिंपरी निर्मळ (वार्ताहर)
पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकर्यांना 34 रुपये प्रति लिटर प्रमाणे हमीभाव देण्याची घोषणा केली आहे. मात्र कायमच शेतकर्यांच्या टाळूवरील लोणी खाणार्या दूध संघ चालकांनी शेतकर्यांना लुटण्याचा अनोखा फंडा शोधला आहे. त्यांनी फॅट व एसएनएफ एका पाँईटने कमी झाल्यास लिटर मागे रुपया कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे कमी भाव शेतकर्यांच्या पदरात पडताना दिसत आहे. ना. विखे पाटील यांनी यात दखल योग्य असे धोरण राबवावे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे.
राज्यातील महायुती सरकारने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकर्यांना 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ या दुधाच्या गुणवत्तेला किमान 34 रुपये हमीभाव देण्याचा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे शेतकर्यांमधून आनंदाचे वातावरण होते. मात्र कायमच शेतकर्यांना लुटण्यासाठी वेगवेगळे फंडे राबविणारे दूध संघ चालकांनी 3.5/8.5 या गुणवत्तेपेक्षा कमी क्वालिटी लागल्यास प्रति पॉईंट एक रुपया कमी करण्यास सुरुवात केली आहे.पूर्वी ही कपात प्रती पॉईट तिस पैसे ते चाळीस पैसे होती. या वाढीव कपातीमुळे शेतकर्यांना पूर्वीपेक्षाही कमी भाव मिळत असल्याचे विदारक चित्र आहे. दिलासा देणारा शासनाचा हमीभाव संघ चालकांच्या या धोरणामुळे शेतकर्यांच्या मुळावर उठला आहे. गायीचा प्रकल्प उभा करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. बँकांचे कर्ज, सध्या पावसाने दिलेला ताण, विकतचा चारा, महागडी औषधे, पशुखाद्याचे चढलेले दर त्यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे.
शासन निर्णयाप्रमाणे 3.5/8.5 या गुणवत्ता असलेल्या दुधाला प्रति लिटर 34 रुपये प्रमाणे दर आहे. मात्र जास्त दूध देणार्या गायीची गुणवत्ता प्रत कमी असते. त्यामुळे 3.4/8.4 गुणवत्ता प्रत आल्यास 33 भाव दिला जातो. 3.0/8.0 या गुणवत्तेला तर 30 पर्यंतही भाव मिळत नाही. पूर्वी ही कपात प्रती पॉईट 30 ते 40 पैसे होती. शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र दूध संघ चालकांच्या मनमानी कारभारामुळे दुग्ध उत्पादक शेतकर्यांवर अन्याय होत आहे. कपात पुर्वीप्रमाणेच व्हावी.
- संजय निर्मळ, दूध उत्पादक शेतकरी