साडेसहा लाखाच्या दूध पावडर चोरी प्रकरणी दोघांना अटक
सार्वमत

साडेसहा लाखाच्या दूध पावडर चोरी प्रकरणी दोघांना अटक

मुद्देमाल जप्त; 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई शिवारातील गोदामातून साडेसहा लाख रुपये किंमतीच्या साडेतीनशे ते चारशे दूध पावडरच्या गोण्या चोरी प्रकरणी नेवासा पोलिसांनी शिंगवे तुकाई येथील दोघा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने 20 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, 13 जुलै रोजी शेख अब्दुल अजीज जैनुद्दीन यांच्या फिर्यादवरुन साडेसहा लाख रुपये किंमतीच्या दूध पावडरची चोरी झाल्याबद्दल 454, 457, 380 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास चालु असतांना 15 जुलै रोजी तपास पथकास गुन्ह्यातील आरोपीबाबत गोपनीय माहीती मिळाली त्यावरुन प्रभारी अधिकारी जनार्दन सोनवणे, तपास अधिकारी ज्ञानेश्वर थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनई यांनी स्वतंत्र दोन पथके तयार केली. मिळालेल्या माहीती प्रमाणे तपास सुरु केला. गोपनीय माहीती प्रमाणे शिंगवे तुकाई शिवारात सापळा रचुन आरोपींना शिताफीने पकडले.

त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे ज्ञानेश्वर मच्छिंद्र पुंड (वय 26) व आविनाश एकनाथ विरदकर (वय 28) दोघेही रा. शिंगवेतुकाई ता नेवासा असे सांगितले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुन्हा वरील दोन आरोपीसह अधिक एक आरोपी असे एकुण तिन आरोपींनी केल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी एका मालवाहु गाडीचा वापर केला आहे.

तसेच नमुद गाडी व मुदेमाल आरोपी ज्ञानेश्वर पुंड रा शिंगवेतुकाई ता नेवासा यांचे घराच्या परीसरात ठेवले असल्याबाबत आरोपींनी माहीती दिलेवरुन सदर ठिकाणी जावुन पंचासमक्ष 3 लाख 93 हजार 750 रुपये किंमतीचा गोवर्धन कंपनीच्या दूध पावडरच्या 25 किलो वजनाच्या एकुण 210 गोण्या, 7 लाख रुपये किंमतीचे अशोक लेलँड मालवाहतूक वाहन असा एकुण 10 लाख 93 हजार 810 रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जनार्दन सोनवणे सहाय्य्क पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ संजय चव्हाण पोहेकॉ दत्तात्रय गावडे, पोलीस नाईक शिवाजी माने, पोकॉ विठ्ठल थोरात, कॉन्स्टेबल बाबा वाघमोडे, पो. कॉ शित्रे, कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल मृत्युंजय मोरे, अमोल भांड यांनी केली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com