राहुरी : दुधाला भाव नसल्याने दरडगावला शेतकर्‍याची आत्महत्या
सार्वमत

राहुरी : दुधाला भाव नसल्याने दरडगावला शेतकर्‍याची आत्महत्या

शेतकऱ्याने श्रीरामपूर येथे गांधी पुतळ्यासमोर दूध आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला होता

Sarvmat Digital

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

लॉकडाऊनच्या काळात दुधाला भाव नसल्याने आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या राहुरी तालुक्यातील दरडगाव येथील पोलीस पाटील रेवन्नाथ मुरलीधर काळे (वय 55) या शेतकर्‍याने काल बुधवारी (दि.22) पहाटेच्या सुमारास राहात्या घरात विषारी पदार्थ घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव येथील एका दूध उत्पादक शेतकर्‍याने दुधास भाव मिळत नसल्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर शेतकरी संघटनेने दि. 15 मे 2015 रोजी श्रीरामपूर येथे गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनात कै. काळे यांचा सहभाग होता. हा खटला अजूनही श्रीरामपूर न्यायालयात सुरू असताना काल त्यांनी दूध भावासाठी आत्महत्या केली.

कै. काळे यांचे बंधू अरूण काळे व त्यांचे शेजारी राजेंद्र भांड यांनी सांगितले, कै. काळे यांच्याकडे वीस गाई आहेत. 70-80 लिटर दूध डेअरीला जाते. शेती अत्यल्प असल्याने परिवाराच्या उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन होते.

करोना लॉकडाऊनमुळे दुधाचे दर घसरले. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. गायींना पशुखाद्य आणायला देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. गाईंचे हाल त्यांना पाहवत नव्हते. त्यामुळे त्यांनी आर्थिक हलाखीतून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन विवाहित मुली असा परिवार आहे. गणेश व योगेश काळे यांचे ते वडील होत.

सन 2015 साली श्रीारामपुरात झालेल्या आंदोलनात जितेंद्र आबासाहेब भोसले, सुरेश पांडुरंग ताके, रामचंद्र ज्ञानदेव पटारे, भारत रामकृष्ण आसने, रेवणनाथ मुरलीधर काळे, बाळासाहेब बाबुराव शेंडगे, अरुण मुरलीधर काळे, गोविंद भानुदास तुपे, सुभाष खंडू मोरे, विकास पद्माकर बडाख, जगन भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हा. खटला (न. 1115/2015) अजूनही श्रीरामपूर न्यायालयात सुरु आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com