दूध आंदोलनप्रश्नी अकोलेत 50 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल
सार्वमत

दूध आंदोलनप्रश्नी अकोलेत 50 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

माजी आ. वैभव पिचड, सीताराम गायकर, मधुकर नवले, सीताराम भांगरे, उगले, वाळूंज यांचा समावेश

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

दुध आंदोलन प्रश्नी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, शेतकरी नेते डॉ. अजित नवले, भाजपचे अध्यक्ष सीताराम भांगरे, कम्युनिस्ट नेते कॉ. कारभारी उगले, अ‍ॅड. शांताराम वाळुंज, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेश नवले आदींसह विविध 50 कार्यकर्त्यांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शनिवारी अकोले व तालुक्यात विविध ठिकाणी दूध भाव व अनुदान प्रश्नी भाजप, दूध उत्पादक संघर्ष समिती, किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात 188, 269 साथीचा रोग प्रतिबंधक कायदा कलम 1897 चे कलम 2 व 3 प्रमाणे हे सर्व गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील लिंगदेव येथे झालेल्या दूध आंदोलन प्रश्नी पो. कॉ. सुरेश घनश्याम पवार यांच्या फिर्यादी वरून भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम नथुजी भांगरे, विठ्ठल शिवराम कानवडे, सत्यवान भिवसेन कानवडे यांचेसह अन्य 15 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर अकोले येथे करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी पो. कॉ. चारुशीला अंबादास गोणके यांच्या फिर्यादीवरून संभाजी ब्रिगेडचे नेते डॉ. संदीप वसंतराव कडलग, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेश रमेश नवले, अध्यक्ष सुरेश नानाभाऊ नवले, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शांताराम नामदेव वाळुंज, कॉ. कारभारी शंकर उगले, किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस व शेतकरी नेते डॉ. अजित सुभाष नवले यांचेसह अन्य 8 कार्यकर्त्यांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तर भाजपच्या वतीने येथील सिद्धेश्वर दूध संस्थेसमोर करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून माजी आमदार वैभव मधुकर पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम कोंडाजी गायकर, सिद्धेश्वर दूध संस्थेचे चेअरमन संदीप किसनराव शेटे, व्हा. चेअरमन अनिल जनार्दन गायकवाड, अमृतसागर दूध संघाचे संचालक भाउपाटील भिमाजी नवले, प्रवीण तात्याबा धुमाळ, गोरक्ष गणपत मालुंजकर, ज्येष्ठ नेते मधुकर लक्ष्मण नवले, बुवासाहेब मल्टिस्टेटचे संचालक रमेश काशीनाथ नाईकवाडी यांचेसह अन्य सात ते आठ अशा सुमारे 50 कार्यकर्त्यां विरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादक यांना दूध प्रश्नी न्याय मिळे पर्यंत असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही, अशा भावना माजी आमदार वैभव पिचड यांचेसह गुन्हा दाखल झालेल्या सर्वच कार्यकर्त्यांच्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com