
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील काष्टी येथे दूध भेसळीच्या ठिकाणावर छापा घातल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी आत्तापर्यत पाच जण ताब्यात घेतले आहे. तर नव्याने पाच जणांची नावे समोर आली असून यातील एकास अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणातील संशयितांची संख्या आता 11 झाली आहे. तर या दुधभेसळीची व्यापती अहमदनगरसह पुणे व सोलापूर पर्यंत पसरली असल्याचे तपासी अधिकार्यांनी सांगितले.
काष्टी येथील संतवाडीतील बाळासाहेब पाचपुते अजून फरार असला तरी अन्य पाच जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर आज नव्याने सतिश उर्फ आबा कन्हेरकर (रा.भगवानगाव,श्रीगोंदा), महेश मखरे (रा.मखरेवाडी,श्रीगोंदा), शुभम बोडखे (श्रीगोंदा), समीर शेख (राहुरी) व कैलास लाळगे (शिरूर) यांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील राहुरी येथील समीर शेख यास पोलीसांनी अटक केली आहे.
या छापेमारीमुळे तालुक्यातील दुध व्यावसाय, दुध डेअरी, संघ याच्याशी निगडीत व या गोरखधंद्यात सहभाग असलेले अनेक भाऊ, दादा, चेरमन फरार झाले आहेत. हे दूध भेसळ करणारे आणि भेसळीचे साहित्य पुरवणारे रॅकेट कुठपर्यंत जाते ते पोलिसांच्या तपासावर ठरणार आहे. पोलीसांच्या तपासात साहित्य पुरवणार्यांची नावे समोर येत आहेत. ते पाहता या दुध भेसळीची व्याप्ती अधिक जिल्ह्यांमध्ये वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने पोलीसांचा तपास देखील सुरू आहे.
दूध कलेक्शन घटले
भेसळीच्या गोरख धंद्याने काही तरुणांना मोहिनी घातली आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळणार असल्याने अनेक शेतकरी तरूण यात अडकले असल्याचे बालेले जात आहे. काष्टीतील छापेमारीनंतर तालुक्यातील दैनंदिन दुध कलेक्शनमध्ये घट आल्याचे समोर आले आहे.