5 हजार बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ

महसूलमंत्री विखेंच्या पुढाकाराने प्रभावी अंमलबजावणी
5 हजार बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनाचा लाभ

आश्वी |वार्ताहर| Ashwi

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाची प्रभावी अंमलबजावणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झाली असून 31 गावामधील नोंदणीकृत 5 हजार 916 बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे.

असंघटीत कामगारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 32विविध योजनांची सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने इमारत व बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना महत्वपूर्ण मानली जाते.

ग्रामीण भागातील इमारत व बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली असून शिर्डी मतदार संघाने यामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येते.

वरील योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारच्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अधिकृत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळू लागला आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. यासाठी जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांचे मार्गदर्शन बांधकाम कामगारांना करण्यात आले होते. अधिकृत नोंदणी झालेल्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळत असून मतदार संघातील 31 गावांमधील 5 हजार 916 कामगार सध्या या भोजनाचा लाभ घेत आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यात समाविष्ट असलेल्या 22 गावांसह मांलुजे डिग्रस या गावांसह गणेश परिसरातील 7 गावांमध्ये सध्या कामगार या मध्यान्ह भोजनाचा लाभ घेत असल्याचे दिसून येते.

सध्या स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 31 गावात योजनेची अंमलबजावणी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली आहे. रोज दुपारी वातानुकूलीत गाडीमधून जेवण कामगारांना पोहोच करण्यात येत असून यामध्ये भात, वरण, चपाती, दोन भाज्या असा कॅलरीज देणार्‍या आहाराचा समावेश असून आता तृणधान्याचा वापरही या आहारात करण्यात येवू लागला असल्याचे दिसून येते.

राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ त्या घटकाला मिळावा हा प्रयत्न सातत्याने राहीला. इमारत व बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करून आधार देण्याचा प्रयत्न केला. योजनेची अंमलबजावणी शिर्डी मतदारसंघात प्रभावीपणे सुरू झाल्याने कामगारांच्या चेहर्‍यावर समाधान दिसते. त्यांच्या कष्टाचा सन्मान योजनेतून करता आला याचा आनंद आहे.

- राधाकृष्ण विखे पाटील, महसूल तथा पालक मंत्री.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com