
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी चार ठिकाणची घरे फोडली आहेत. नगर तालुक्यातील पोखर्डी, पिंपळगाव माळवी तसेच चेतना कॉलनी आणि नवनागापूर भागात चार ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पोखर्डी शिवारातील गोविंद काळदेव काळापहाड (वय 35) यांचे घर चोरट्यांनी बुधवारी सकाळी सात ते शुक्रवारी आठ वाजण्याच्या दरम्यान फोडले. सुमारे 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व एक लाख पाच हजार रूपयांची रोख रक्कम असा एक लाख 30 हजारांचा ऐवज चोरला. काळापहाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव माळवी येथील अनिता भगवान साबळे (वय 43) यांच्या घराचे कुलूप चोरट्यांनी गुरूवारी सकाळी नऊ वाजता तोडून सोने-चांदीचे दागिने असा 35 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. साबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
चेतना कॉलनीतील रहिवाशी मिरा रामू हिवाळे (वय 42 मूळ रा. सांगवी जि. जालना) या सध्या चेतना कॉलनीतील शेवाळे यांच्या घरात भाड्याने घर घेऊन राहत आहेत. चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 32 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरीला गेला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनागापूरातील साईराजनगरमधील माऊली अपार्टमेंटमध्ये राहणारे संदीप प्रकाश चव्हाण (वय 47) यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 12 हजार 900 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेली आहेत. या प्रकरणी चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.