एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये अवैध धंद्यांचे बस्तान

अवैध माल साठवणुकीसाठी होतो वापर
एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये अवैध धंद्यांचे बस्तान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी परिसरात उभ्या असलेल्या अनेक गोडाऊनचा वापर अवैध धंद्यासाठी होत असल्याची बाब समोर आली आहे. अलिकडेच एका गोडाऊनमध्ये सुमारे चार कोटींचा रक्तचंदनाचा साठा आढळून आला होता. यापूर्वी कोतवाली पोलिसांनी एका गोडाऊनवर टाकलेल्या छाप्यात सुमारे एक कोटीचा गुटखा सापडला होता. यामुळे येथे असलेल्या गोडाऊनमध्ये रक्तचंदन, गुटखा, मावा यांचा साठा होत असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही.

दरम्यान अशा गोडाऊनविषयी एमआयडीसी पोलिसांसह, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही शोधमोहीम राबवणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्याकडून तसे होताना दिसत नाही. दरम्यान एमआयडीसीत उद्योग-धंद्यांच्या नावाखाली गोडाऊन स्थापन करून त्यातून अवैध धंदे जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. येथील नागापूर, नवनागापूर, निंबळक, बोल्हेगावचा भाग एमआयडीसी परिसरात येतो. या परिसरात अनेक कंपन्या आहेत. छोटे-मोठे उद्योग-धंदे याठिकाणी चालतात. दरम्यान माल साठवणुकीसाठी गोडाऊनची उभारणी केली जाते. काही व्यक्तींनी गोडाऊनचे बांधकाम करून ते भाडोत्री उपलब्ध करून दिले आहेत.

येथील वखार महामंडळ परिसरात असलेल्या सदाशिव झावरे याने त्याच्या चार गोडाऊन पैकी एक गोडाऊन चक्क रक्तचंदनासाठी उपलब्ध करून दिले. याबदल्यात तो दररोज हजारो रूपयांचे भाडे घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दोन महिन्यापूर्वी कोतवाली पोलिसांनी अहमदनगर शहरात गुटखा विक्री करताना दोघांना पकडले होते. त्यांच्या माहितीवरून गुटख्याचा मोठा साठा बोल्हेगाव परिसरातील एका गोडाऊनमध्ये जप्त करण्यात आला होता. यावरून असे समोर आले आहे की, एमआयडीसी परिसरात उद्योग-धंद्यासाठी उभा करण्यात आलेले गोडाऊन अवैध धंद्यासाठी वापरले जात आहे. अशा गोडाऊनचा पोलिसांनी शोध घेण्याची गरज आहे.

रात्रीच्या हालचाली जोरात

एमआयडीसी परिसरात उभ्या करण्यात आलेल्या गोडाऊनमध्ये काही अवैध मुद्देमाल साठवून ठेवला असेल तर तेथे रात्रीच्या वेळीच हालचाली चालतात. दिवसा या गोडाऊनला कुलूप असते. यामुळे कोणालाही काही शंका येत नाही. दरम्यान गोडाऊनमध्ये एखादा चांगला मुद्देमाल साठवून ठेवला असल्याचेही भासविले जाते. असाच प्रकार रक्तचंदनाच्या साठ्याबाबत समोर आला आहे. बटाटा भरून ठेवलेल्या गोण्याच्या खाली रक्तचंदन साठवून ठेवले होते. येथे बटाटा ठेवला जात असल्याचे भासविण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com