म्हाळादेवीच्या शेतकर्‍यांनी निळवंडे कालव्याचे काम पाडले बंद

म्हाळादेवीच्या शेतकर्‍यांनी निळवंडे कालव्याचे काम पाडले बंद

अकोले|प्रतिनिधी|Akole

आपल्या विविध मागण्यांसाठी म्हाळादेवी ग्रामस्थांनी निळवंडे कालवे खोदाईचे सुरू असणारे काम काल दुपारी बंद पाडले. मागण्या मान्य होईपर्यंत कालव्याचे काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा म्हाळादेवीचे उपसरपंच व खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप हासे यांनी दिला आहे.

शेतकर्‍यांच्या कालव्यामध्ये तुटलेल्या पाईपलाईन प्रशासन व ठेकेदार यांच्या खर्चातून जोडून देण्यात याव्यात, कालव्यावरील क्रॉसिंग होणार्‍या रस्त्यावर छोटे- छोटे पूल बांधावेत, ओढ्यावर सुरू असणार्‍या पुलासाठी कॉलम घेऊन ठेवले आहेत, गेली पाच वर्षांपासून ते काम बंद आहे ते काम जलदगतीने सुरू करावे, कालव्यामध्ये ज्या शेतकर्‍यांची घरे जाणार आहेत, त्यांना घरकुल योजनेद्वारे घर बांधून द्यावे, कालवेग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे आदी मागण्या म्हाळादेवीच्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कालव्याचे काम सुरू होऊ देणार नसल्याचा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, मिनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, युवक अध्यक्ष रवींद्र मालुंजकर, विनोद हांडे, राजेंद्र कुमकर, विकास बंगाळ, भाऊसाहेब आभाळे, भाऊसाहेब मेदगे, बाळासाहेब घोडके,भगवान करवर, सुभाष मालुंजकर, सतीश तिकांडे, दिलीप हासे, अनिल मुंढे, संजय हासे, कैलास मुंढे, सुभाष हासे, कैलास हासे, पवन हासे, रोहिदास वैष्णव, एकनाथ हासे, बंडू हासे, रामदास हासे, विठ्ठल हासे, बाळकृष्ण हासे, जनार्दन हासे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेत असताना शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी निळवंडे कालव्याचे म्हाळादेवी येथे सुरू असलेले काम बंद पाडल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com