म्हैसगाव, तांभेरे, राहुरी फॅक्टरी येथील ‘त्या’ व्यापार्‍यांचे परवाने निलंबित

भगरपीठातून विषबाधा भगरपीठाचा साठा जप्त
म्हैसगाव, तांभेरे, राहुरी फॅक्टरी येथील ‘त्या’ व्यापार्‍यांचे परवाने निलंबित

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

राहुरी फॅक्टरी येथील एका किराणा दुकानदाराकडून भगर नेणार्‍या ग्राहकांना विषबाधा झाल्यानंतर नागरिकांसह प्रशासनही हादरून गेले.

या घटनेची दखल घेत अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी, म्हैसगाव, तांभेरे येथे विविध किराणा दुकानांत छापा टाकून भगरपीठाचा साठा जप्त केला.

तसेच जनतेचे आरोग्य धोक्यात आणल्याने वरील तिन्ही गावांतील किराणा दुकानदारांचे परवाने पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले असून त्यांनी वितरित केलेले भगरपीठ ज्या ग्राहक व व्यावसायिकांना वितरित केले आहे, त्यांच्याकडून ते पुन्हा परत घेऊन त्याचा अहवाल पाठविण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांनी दिले आहेत.

रविवारी दि. 18 रोजी राहुरी फॅक्टरी येथील एका होलसेल किराणा व्यापार्‍याकडून घेतलेल्या भगरपीठामुळे उलट्या व जुलाब होऊन विषबाधा झाली होती. त्यावर नगर येथील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी तांभेरे, म्हैसगाव व राहुरी फॅक्टरी येथे किराणा दुकानांची तपासणी केली.

मौजे म्हैसगाव येथील बाळासाहेब बाबुराव गागरे यांच्या मातोश्री सुपर मार्केट येथे भेट देऊन तपासणी केली व भगर पीठाचा नमुना घेऊन उर्वरित साठा 29 किलो जप्त केला. बापूसाहेब रामभाऊ जाधव यांच्या सचिन किराणा स्टोअर्स येथे भेट देऊन तपासणी केली व भगर पीठचा नमुना घेऊन उर्वरित 6 किलो साठा जप्त केला. तांभेरे येथे रवींद्र उत्तम मुसमाडे यांच्या श्रीराम किराणा व जनरल स्टोअर्स या आस्थापनेची तपासणी केली असता याठिकाणी भगर पीठाचा साठा आढळून आला नाही.

वरील तिन्ही दुकानदारांना त्यांनी ग्राहकांना विक्री केलेले व उपलब्ध असलेले भगर पीठ रिकॉल करण्याबाबत आदेश दिले आहेत. वरील तिन्ही व्यापार्‍यांनी राहुरी फॅक्टरी येथील अक्षय ट्रेडर्स यांच्याकडून भगर पीठ खरेदी केले होते. अक्षय टेडर्स या आस्थापनेची तपासणी केली असता याठिकाणी भगर पीठाचा साठा आढळून आला नाही. संबंधित विकेत्याकडे तपासणी केली असता त्यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील अरिहंत फुडस इंडस्टिज यांच्याकडून (बिल नं. 921) नुसार खरेदी केल्याचे सांगितले.

ही भगर त्यांनी स्वतःच्या गोडावूनमध्ये ठेऊन दि . 26सप्टेंबर 2020 ते 5 ऑक्टोबर 2020 पर्यत श्रीरामपूर एमआयडीसीमधील सन्मती फुडस इंडस्टिज यांच्याकडून दळून घेऊन अक्षय टेडर्स यांनी पुरवठा केलेल्या 1 किलो पॉलिथीन बॅगमध्ये 1400 किग्रॅ भगर पीठ विक्रीसाठी प्राप्त करून घेतले. दि. 11 ऑक्टोबर 2020 पासून दि. 17 ऑक्टोबर 2020 पर्यंत म्हैसगाव, तांभेरे, राहुरी फॅक्टरी परिसर येथील व्यापार्‍यांना व ग्राहकांना विक्री केली आहे.

त्यांनी उत्पादित व विक्री केलेल्या भगर पीठामुळे अनेक लोकांना उलटी, मळमळ व जुलाबाचा त्रास झाल्यामुळे त्यांनी जनतेचे आरोग्य धोक्यात आणलेले आहे. म्हणून त्यांना प्रदान करण्यात आलेला परवाना पुढील आदेश मिळेपर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी प्र.बा.कुटे यांनी सहायक आयुक्त ( अन्न ) सं.पां.शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com