करोनातही मर्चंटस् बँकेला 5 कोटी नफा - अनिल पोखरणा

ठेवींमध्ये 117 कोटींनी वाढ
करोनातही मर्चंटस् बँकेला 5 कोटी नफा -  अनिल पोखरणा

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोना काळातही अहमदनगर मर्चंटस् बँकेला मागील आर्थिक वर्षात 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा झाला असून ठेवींमध्ये 117 कोटी 73 लाखांची वाढ झाल्याची माहिती चेअरमन अनिल पोखरणा यांनी दिली.

करोनात संपलेल्या आर्थिक वर्षातही बँकेची यशस्वी घोडदौड कायम राहिली आहे. कोरोना संकटात अर्थकारणाला ब्रेक लागलेला असतानाही बँकेने उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत 31 मार्च 2021 अखेरपर्यंत 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून ठेवींमध्येही मागील आर्थिक वर्षात 117 कोटी 73 लाखांनी वाढ झाली असून 31 मार्च 2021 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 1371 कोटीवर पोहचल्या आहेत.

2020-2021 या आर्थिक वर्षात बँकेच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर करताना चेअरमन पोखरणा यांनी सांगितले की, मागील आर्थिक वर्षात बँकेचे संस्थापक चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक हस्तीमलजी मुनोत यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली व माजी चेअरमन आनंदराम मुनोत, व्हाईस चेअरमन सुभाष बायड तसेच संचालक मंडळातील सर्व सहकारी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारिया, जॉइंट सीईओ नितिन भंडारी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानातून बँकेने उत्तम कामगिरी केली आहे.

बँकेच्या ठेवी 31 मार्च 2020 अखेर 1253 कोटी 49 लाख इतक्या होत्या. त्यात 31 मार्च 2021 पर्यंत 117 कोटी 73 लाखांनी वाढ होवून एकूण ठेवी 1371 कोटींच्या झाल्या आहेत. 31 मार्च 2020 अखेर कर्ज वितरण 875 कोटी 61 लाख रुपये होते. त्यात आर्थिक वर्षात 38 कोटी 61 लाखांनी घट होवून 31 मार्च 2021 अखेर एकूण कर्ज वितरण 837 कोटी रुपये इतके आहे. बँकेमार्फत नजरगहाण कर्जाव्यतिरिक्त गृहतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज, वाहन, वस्तू, शेअर्स तारण, शॉप ऑफिस खरेदी कर्ज, कमर्शियल इमारत बांधणी कर्ज, स्थावर मिळकत तारण कॅशक्रेडिट आदी कर्ज उपलब्ध आहेत. त्याचा लाभ अनेक सभासद घेत आहेत. नजरगहाण कर्जावरील व्याजदर रिबेट वजा जाता 8.50 टक्के इतके आहे. सोनेतारण कर्जात 2 लाखापर्यंत 8 टक्के व्याजदर असून सोनेतारण कॅशक्रेडिट 5 लाखापर्यंत 8 टक्के व्याजदर, वाहन कर्ज (खासगी कार) 25 लाखापर्यंत 8 टक्के एवढेच व्याजदर असून ते कोणत्याही नागरी सहकारी बँकेपेक्षा कमी आहे.

मागील आर्थिक वर्षात 31 मार्च 2020 अखेर बँकेचे रिझर्व्ह व इतर फंडस 145 कोटी 18 लाख रुपये होता. त्यात 14 कोटी 20 लाखाने वाढ होवून 31 मार्च 2021 अखेर ते 159 कोटी 38 लाखांचे झाले असून वाढीचे प्रमाण 9.78 टक्के इतके आहे. कोविड महामारीमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी, अर्थकारणाला बसलेला फटका यामुळे देशातील सर्व बँकांसमोर थकीत कर्ज वसुलीची समस्या निर्माण झालेली आहे. याही परिस्थितीत बँकेने कर्ज वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले. दि.31 मार्च 2021 अखेर बँकेचे निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण 7.64 टक्के इतके आहे.

बँकेच्या 49 वर्षात जिल्ह्यासह पुणे, औरंगाबाद,बीडमध्ये 18 शाखा आहेत. सातत्याने प्रगती करणारी बँक म्हणून मर्चन्टस् बँकेची ओळख निर्माण झाली. नफ्यासोबतच ठेवीमध्येही वाढ झाली, ही अभिमानास्पद कामगिरी आहे.

- अनिल पोखरणा, चेअरमन.

आर्थिक वर्षात बँकेने कर्जदारांना व्याजामध्ये 18 कोटी 2 लाखांचा भरघोस रिबेटही दिला आहे. याही परिस्थितीत बँकेने 16 कोटी 75 लाखांचा ढोबळ तर 5 कोटी 22 लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात कोविड परिस्थितीमुळे तुलनेने नफा कमी झालेला असला तरी संचालक मंडळाने 15 टक्के लाभांश देण्याचा मानस केला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागण्यात येणार असून परवानगी मिळताच सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर लाभांश वाटप करण्यात येईल, असे चेअरमन पोखरणा यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com