
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या अहमदनगर मर्चंट्स बँकेवर अपेक्षेप्रमाणे संस्थापक-अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्या नेतृत्वा खालील जनसेवा पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. सोमवारी (दि.27) झालेल्या या बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत तब्बल 93 टक्के मते मिळवून जनसेवा पॅनेलचे सर्व 16 उमेदवार सरासरी सुमारे साडेसात हजारावर मते मिळवून विजयी झाले.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील या पॅनेलचा उमेदवार या आधीच बिनविरोध झाला आहे. त्यामुळे सर्व 17 जागांवर विजय मिळवून बँकेची सत्ता पुन्हा जनसेवा पॅनेलच्या ताब्यात आली आहे. या निवडणुकीत चार उमेदवार स्वतंत्रपणे उभे होते. पण त्यांचा साफ धुव्वा उडाला. यातील फक्त एकाच उमेदवाराला मतांची चार आकडी संख्या गाठता आली.
करोनामुळे दोन वर्षे उशिरा मर्चंटस बँकेची निवडणूक झाली. बँकेच्या 17 हजार 508 मतदारांपैकी 8 हजार 518 मतदारांनी (49 टक्के) रविवारी मतदानाचा हक्क बजावला. काल निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. बहुतांश मतदारांनी क्रॉस व्होटींग टाळल्याने बाद मतांचे प्रमाण कमी राहिले. परिणामी, अपेक्षेपेक्षा लवकर मतमोजणी पूर्ण झाली.
सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाल्यावर सकाळी 11 च्या सुमारास निवडणूक निकालाचा कल व दुपारी दीडच्या सुमारास अंतिम निकालही स्पष्ट झाला होता. मतदान झालेल्या 8 हजार 518 मतपत्रिकांपैकी अवघ्या 224 मतपत्रिका बाद झाल्या. त्यामुळे वैध मतदान 8 हजार 294 होते. त्यापैकी सरासरी 93 टक्के मते मिळवून सत्ताधारी जनसेवा पॅनेलने बाजी मारली.
उमेदवारांना मिळालेली मते
या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विद्यमान संचालक सुभाष बायड बिनविरोध झाले आहेत. अन्य उमेदवारांना मिळालेली मते अशी सर्वसाधारण मतदारसंघः किशोर गांधी-7460, संजीव गांधी- 7180, संजयकुमार चोपडा-7392, अनिलकुमार पोखरणा-7603, मोहनलाल बरमेचा-7414, संजय बोरा-7527, कमलेश भंडारी-7580, अजय मुथा-7428, अमित मुथा-7440, आनंदराम मुनोत-7540, किशोर मुनोत-7212, हस्तीमल मुनोत-7455. महिला राखीव मतदार संघः प्रमिला बोरा-7710 व मीना मुनोत-7601. इतर मागासवर्ग मतदार संघ : विजयकुमार कोथिंबिरे-7360 व विजा-भज-विमाप्रमतदार संघ : सुभाष भांड-7440. पराभूत उमेदवारांना मिळालेली मते अशी : सर्वसाधारण मतदार संघ : प्रमोद अष्टेकर - 780 व हरिष भांबरे-1340. महिला मतदारसंघः श्रुतिका मगर-672. इतर मागासवर्ग राखीव मतदार संघ : हरिष भांबरे-974. विजा-भज-विमाप्र मतदारसंघ : प्रमोद अष्टेकर-597 व निशांत दातीर-192.