अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
व्यापार्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांच्याकडील बॅग चोरून नेल्याची घटना शहरातील बडीसाजन मंगल कार्यालयाजवळ शुक्रवारी (दिनांक 12 मे) दुपारी घडली. सुरज चंद्रभान अग्रवाल (वय 43 रा. बुरूडगाव रोड) असे जखमी व्यापार्याचे नाव आहे.
त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी कोतवाली पोलिसांना शनिवारी (दिनांक 13 मे) दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता सुरज अग्रवाल हे शहर सहकारी बँकेत जात असताना बडीसाजन मंगलकार्यालयाशेजारी असलेल्या त्यांच्या वडिलांच्या मालकीच्या प्लॉटवर ते गेले असता तेथे आलेल्या तिघांनी अग्रवाल यांच्याकडील बॅग ओढली.
अग्रवाल यांनी विरोध केला असता तिघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अग्रवाल यांच्या हाताला मार लागला असून तिघे बॅग घेऊन पसार झाले आहेत. अग्रवाल यांनी मदतीसाठी एकाला विनंती केल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.उपचारादरम्यान कोतवाली पोलिसांनी अग्रवाल यांचा जबाब नोंदविला असून तिघा अनोळखीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार दाणी अधिक तपास करीत आहेत.