करोनामुळे प्रियजणांना गमावल्याने अनेकांना मानसिक आजार

डॉ. जोशी : रोगप्रतिकार शक्तीसोबत मानसिक प्रतिकार शक्ती महत्वाची
करोनामुळे प्रियजणांना गमावल्याने अनेकांना मानसिक आजार

राहाता (प्रतिनिधी) - करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावल्याने अनेकांना मानसिक आजाराला सामोरे जावे लागत आहे. वेळेत बेड मिळाला नाही, वेळेवर उपचार मिळू शकले नाही किंवा सर्व औषधोपचार करुनही कुटूंबातील प्रिय व्यक्ती गमावल्याने अनेकांना मानसिक आजार जडत आहेत. मानसिक आजारातून सुटका व्हावी याकरिता मानसिक आधार देणे आता तितकेच महत्वाचे आहे. शिर्डी येथील मानसोपचार तज्ञ डॉ. ओंकार जोशी यांनी मानसिक आजाराची भिती व्यक्त करताना शारिरीक तंदुरुस्ती सोबत आता मानसिक तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

करोनाचे संकट दुसर्‍या लाटेत अधिकच गडद झाले. प्रिय व्यक्तीला गमावल्याचे दुःख अनेक जण पचवू शकले नाही. सारखा तोच तोच विचार मनात घोंगावत असल्याने मानसिक आजार बळावू लागला आहे. कोणाची आई, कोणाचे वडील, पती किंवा पत्नी, कोणाचा भाऊ, सहकारी, मित्र अशी जवळची व्यक्ती गमावल्याचा सातत्याने घोंगावणारा मनातील विचार मानसिक आजाराचे कारण ठरत आहे. यातून आत्महत्या करण्यासारखा विचार मनात घर करत आहे. मानसोपचार तज्ञांकडे मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. मानसिक आजारातून मुक्त होण्यासाठी अशा रुग्णांना वेळेत उपचार करणे आवश्यक आहे.

मानसोपचार तज्ञ असलेले डॉ. ओंकार जोशी यांनी मानसिक आजारात वाढ होत असल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. अनेक रुग्ण मानसिक उपचारासाठी येत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. नित्य योगा, व्यायाम अशा शारिरीक व्यायामासह मानसिक रोग प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. विचीत्र विचार डोक्यात घर करत असतील, भीती वाटत असेल तर तात्काळ उपचार करावा. 6 ते 8 तास शांत झोप घेणे तितकेच आवश्यक आहे. निगेटीव्ह बातम्या बघण्यापेक्षा सकारात्मक गोष्टी आणि एखादा छंद जोपासणे हे जेवढे करोना रुग्णांसाठी महत्वाचे आहे तितकेच मानसिक आजाराने त्रस्त रुग्णांसाठी देखील महत्वाचे आहे. घरातील सर्वांनी एकत्र येत एकमेकांशी संवाद वाढवावा. एकत्र जेवण करणे, एकत्र कामे करणे यासह लहान मुलांना आणि घरातील ज्येष्ठांना वेळ द्यावा ज्यामुळे सकारत्मक मानसिकेतेला बळ मिळेल, असे डॉ. जोशी म्हणाले.

राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे, प्रांतधिकारी गोविंद शिंदे, पत्रकार प्रमोद आहेर यांच्या संकल्पेनेतून हा उपक्रम सुरू केला असुन राहाता आणि कोपरगाव तालुक्यातील 30 प्राथमिक शिक्षकांना करोना रुग्णांशी कसा संवाद साधायचा याचे प्रशिक्षण दिले आहे. फोनद्वारे समुपदेशन कसे करायचे, रुग्णांची भिती कशी कमी करायची हे यात शिकवले. गेल्या महिन्याभरात 3 हजार रुग्णांशी संवाद साधत त्यांना आधार आणि मानसिक बळ देण्याचे काम या माध्यमातून झाले आहे. अनेक रुग्णांनी या उपक्रमाचे कौतुक केले असुन इतर जिल्ह्यातही हा उपक्रम राबवणार असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com