संगमनेर : मेंढवणच्या घरफोडीतील एक आरोपी जेरबंद

संगमनेर : मेंढवणच्या घरफोडीतील एक आरोपी जेरबंद
जेरबंद

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कार्थळवाडी येथे चौघा चोरट्यांनी रात्रीच्यावेळी वस्तीवर राहणार्‍या शिक्षकाच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन सुमारे सव्वा तीन लाखाची चोरी केली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तालुका पोलिसांनी तपास करुन एका आरोपीस जेरबंद केले आहे.

मेंढवण येथील शिक्षक हरिश्चंद्र बाजीराव काळे यांच्या वस्तीवर रविवार 21 मार्च 2021 रोजी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली होती. एकुण 3 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. अशी फिर्याद हरिश्चंद्र काळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. हरिश्चंद्र काळे यांच्याकडे वाट्याने शेती करणारा एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीबरोबर शेतमालावरुन वादीवाद झाला होता. त्यानंतर सदर व्यक्ती वाट्याने शेती करण्याचे सोडून देवून निघून गेला. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला.

श्रीरामपूर तालुक्यातील किरण आबासाहेब भवार (रा. ब्राम्हणगाव वेताळ) हा हरिश्चंद्र काळे यांच्याकडे वाट्याने शेती करण्यासाठी होता. याआधारे तालुका पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. सदर घटनेच्या संदर्भाने त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर काही बाबी पोलिसांना निदर्शनास आल्या. काळे यांच्याशी वादावादी झाल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा घडवून आणला होता. भवार याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत केली असून स्वीप्ट कार लवकरच हस्तगत करणार आहोत, सदर गुन्ह्यातील गुन्हेगार हे गंभीर स्वरुपाचे आहेत.

या गुन्हेगारांनी साधारण सात ते आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. किरण आबासाहेब भवार यास अटक करण्यात आली असून उर्वरीत तिघा जणांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com