श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुढील आठवड्यात श्रीरामपुरात वॉर्डनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांची

क्षमता पाहुन त्यांना कामाला लागा असे सांगितले जाईल असे माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट करतानाच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजपाच्या चिन्हावर तर सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत पुढील महिन्यात बैठक घेऊन कुणाशी युती करायची याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर येथील पंचायत समिती आढावा बैठकीनंतर आ. विखे यांनी अपहरण करून हत्या झालेल्या व्यापारी गौतम हिरण यांच्या श्रीरामपूर येथील निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले. त्यानंतर बेलापूर रस्त्यावरील काळे रसवंती येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, भाजपाचे नेते प्रकाश चित्ते, नानासाहेब शिंदे, विठ्ठल राऊत, बबन मुठे व्यासपिठावर होते.

आ. विखे पुढे म्हणाले, व्यक्तीद्वेषाच्या राजकारणाने मनोरंजन होते, परंतु संघटनेची बांधणी होणार नाही. तरुण महिला व बेरोजगार यांना बरोबर घेऊन त्यांच्यात आशावाद निर्माण करावा लागेल. पुढील काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका भाजपा म्हणून लढवायच्या आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी पुढील महिन्यात गट व गावनिहाय बैठका घेऊन युतीबाबत योग्य वेळ आल्यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारवर टिका कराताना आ. विखे म्हणाले, महाआघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराने कळस केला असून हे सरकार सर्वच आघाडींवर अपयशी ठरले आहे. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी या सरकारची अवस्था झाली असल्याची टीका त्यांनी केली.

आ. विखे पा. म्हणाले, मंत्रालयात भ्रष्टाचार बोकाळला असून वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. यावर कोणी बोलायला तयार नाही. सरकारला कोवीडचे कारण झाले आहे. भ्रष्टाचार वाळू माफियांना कोवीड नाही, केवळ योजनांसाठी कोवीड आहे.

दीपक पटारे म्हणालेे, ग्रामपंचायत निवडणुकीत विखे गट पहिल्या क्रमांकावर राहिला. पुढील काळात फ़क्त विखे गटच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाऊसाहेब बांद्रे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गिरीधर आसने, निवृत्ती बडाख,गणेश मुदगुले, अनिल भनगडे, बेलापूर सरपंच महेंद्र साळवी, संदीप चोरगे, भिमा बागुल, राधाकृष्ण आहेर, रामभाऊ लिप्टे आदी उपस्थित होते.

मुरकटे यांनी आता विचार करावा

मुरकुटे यांनी कोणाबरोबर राहयचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत सत्ताधा-यांनी त्यांना दिलेला शब्द पाळला नाही. त्यांना धोका दिला आहे. आमचे नेते शब्द पाळणारे आहेत. त्यांनी अद्याप कोणाला धोका दिला नाही. त्यामुळे यापुढे काय करायचे, कोणाबरोबर राहयचे याबाबत त्यांनी विचार करण्याची गरज असल्याचे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांनी केले आहे.