‘मी हिंदुस्तानी’चे 16 दिवसांत 50 प्रयोग !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘पसायदान’चा उपक्रम || 75 दीर्घांकिकांचा संकल्प
‘मी हिंदुस्तानी’चे 16 दिवसांत 50 प्रयोग !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त अहमदनगरच्या पसायदान अकादमीने आगळा वेगळा प्रकल्प हाती घेतलेला आहे. ‘मी हिंदुस्तानी’ या एकांकिकेचे 11 जुलै ते 15 ऑगस्ट या 35 दिवसात 75 प्रयोग करण्याच्या संकल्प केलेला आहे. त्याअंतर्गत केवळ सोळा दिवसात 50 प्रयोग करून 26 जुलै रोजी प्रयोगांचा सुवर्ण महोत्सवी टप्पा पार केला आहे.

भारतीय संस्कृती, संस्कार, चालिरीती, परंपरा, शिक्षण पद्धति, हिंदुस्तानी वैशिष्ठ्ये यातून निर्माण होणारा जुन्या व नव्या पीढीतील संघर्ष मी हिंदुस्तानी या एकांकिकेत लेखक तेजस परसपाटकी व पी. डी. कुलकर्णी यांनी केलेले असून दिग्दर्शन स्वतः पी. डी. कुलकर्णी यांनी केलेले आहे. पी. डी. कुलकर्णी व कोमल पाटील भूमिका करीत आहेत. त्यांना निर्मितीसाठी कल्पना नवले, सरिता पटवर्धन यांनी सहाय्य केले आहे. शैलेश देशमुख यांचे संगीत असून सुधीर देशपांडे यांचे नेपथ्य आहे. पुण्यातील यतीन कुलकर्णी हे संपूर्ण ध्वनी यंत्रणा संभाळत आहेत. सौ.सुलभा कुलकर्णी या सूत्रधार आहेत.

या दीर्घांकातील आशय जितका महत्वाचा आहे तितकीच कलाकारांचं वय, हेतू, इच्छाशक्ती, संकल्प आणि समाजाप्रती, देशाप्रती असणारी बांधिलकी जास्त वाखाणण्याजोगी आहे. कारण एवढ्या कमी वेळात 75 प्रयोगांचं नियोजन, आयोजन आणि सादरीकरण ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. त्या साठी लागणारे अपार कष्ट सर्व जण मनापासून घेत आहेत. त्यात महत्वाची बाब ही की हे सर्व प्रयोग हे कुठलेही मानधन न स्वीकारता अगदी विनामूल्य तत्वावर फक्त देशप्रेमाचा विचार समाजमनात रुजावा या हेतूने केला जात आहे. अशा विक्रमी स्वरूपाचा महाराष्ट्रातून होणारा हा एकमेव प्रकल्प आहे.

या एकांकीकेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. 75 प्रयोगांचा संकल्प केला असला तरी प्रयोगांना मागणी असल्याने 15 ऑगस्टपर्यंत शंभरी पूर्ण होईल असा विश्वास पी. डी. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. 15 ऑगस्ट रोजी संकल्प पूर्ती एका शानदार समारंभात करण्यात येणार आहे अशी माहिती पी. डी. कुलकर्णी यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com