सराईत गुन्हेगार संदीप कदमसह तिघांविरूद्ध मोक्का

घाटात करायचे वाहन चालकांची लुट
सराईत गुन्हेगार संदीप कदमसह तिघांविरूद्ध मोक्का

अहमदनगर (प्रतिनिधी) - घाटामध्ये वाहन चालकांना आडवून मारहाण करत लुटणार्‍या सराईत गुन्हेगार संदीप कदम याच्यासह तिघांविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळी प्रमुख संदीप दिलीप कदम (वय 25 रा. डोंगरगण ता. नगर), शशिकांत सावता चव्हाण (वय 22 रा. अंबीजळगाव ता. कर्जत), सोमनाथ रामराव खलाटे (रा. आष्टी जि. बीड) असे मोक्का लावलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपीविरूद्ध जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक आश्‍वती दोर्जे यांनी परवानगी दिली आहे. या प्रकरणाचा तपास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहे. इमामपूरच्या घाटासह शेंडी बायपास व परिसरात वाहन चालकांना आडवून शस्त्राचा धाक दाखविणे, त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील पैसे काढून घेणे असे कृत्य संदीप कदम व त्याचे साथीदार करत होते.

या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात संदीप कदम याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. सदर प्रस्ताव पोलीस अधीक्षक पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला त्यांनी मंजूरी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com