
श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेवून त्यांच्यावर अत्याचार करुन निकाह केल्याप्रकरणातील प्रमुख आरोपी इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्यासह ६ जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर पाटील यांनी तसे आदेश बजावले असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी याप्रकरणी सखोल तपास करून संघटीत गुन्हेगारी मोक्का कायद्याअंतर्गत प्रस्ताव केला होता. त्याला विशेष पोलीस महासंचालक डॉ. बी. जे. शेखर पाटील यांनी मंजुरी दिली आहे.
अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन धर्मांतर करणे व बेकायदेशीर निकाह करुन सामुहिक अत्याचार करणे अशा अतिशय गंभीर गुन्ह्याची दखल विधीमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती व सखोल चौकशी चे आदेश दिले होते. त्यावरून डीवायएसपी संदिप मिटके यांनी आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे धर्मातर करुन अत्याचार करणे व निकाह करुन वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीची विक्री हे भयंकर वास्तव समोर आले.
याप्रकरणातील प्रमुख आरोपी इमरान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर, पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे, सुमन मधुकर पगारे, सचिन मधुकर पगारे, बाबासाहेब एकनाथ चेंडवाल, मिनाबाई रूपचंद मुसावत या सहा जणांवर मोक्का कायद्यार्तंगत कारवाई पोलीसांनी केली. या धड़क व गुन्हेगारांना जरब बसविणार्या कारवाईचे जनतेतून स्वागत होत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सर्व आरोपींवर मिळुन तब्बल ५० गुन्हे दाखल आहे.