महापौर बाबासाहेब वाकळे
महापौर बाबासाहेब वाकळे
सार्वमत

हलगर्जी करणार्‍या मानधनावरील कर्मचार्‍यांना काढून टाका

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सूचना

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

विद्युत विभागातील कामे वेळेत करणे आवश्यक असून, कामात हलगर्जी करणार्‍या मानधनावरील कर्मचार्‍यांना काढून टाकून तेथे नव्याने कर्मचारी नियुक्त करावेत, अशा सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिल्या.

विद्युत विभागात प्रमुख म्हणून आर. जी. मेहेत्रे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत या विभागाचा आढावा महापौर वाकळे यांनी घेतला. यावेळी विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, सुनील त्रिंबके, कुमार वाकळे, उपायुक्त प्रदीप पठारे, आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे आदी उपस्थित होते. महापौर म्हणाले, या विभागात 10 वायरमन, मानधनावरील 9 कर्मचारी असून संपूर्ण शहराचे लाईट चालू बंद करण्याचे काम मानधनावरील कर्मचारी करतात. शहर व उपनगरामध्ये बर्‍याच ठिकाणी सायंकाळी लवकर पथदिवे सुरू करून सकाळी उशिरापर्यत चालू राहतात. संबंधित कर्मचार्‍यांनी याच्या वेळा पाळायला हव्यात.

हलगर्जीपणा करणार्‍या मानधनावरील कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकून नव्याने कर्मचारी घ्यावेत. वायरमननेही प्रभागांमध्ये फिरून पथदिवे चालू आहेत की नाही, याची खात्री करावी. विद्युत विभागाकडील हायड्रोलिकच्या एक नादुरुस्त वाहन तातडीने दुरुस्त करून घ्यावे, या वाहनावर दोन वाहन चालक मानधनावर घ्यावेत. विद्युत विभागास आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग देण्यात यावा, असे आदेश यावेळी देण्यात आले.

कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे महापालिकेचे नुकसान होत असल्यास संबंधितांच्या पगारातून नुकसान वसूल करण्यात येईल, अशी तंबीही महापौर वाकळे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com