रस्ते व चौकांचे सुशोभीकरण युद्धपातळीवर - नगराध्यक्ष गोंदकर

रस्ते व चौकांचे सुशोभीकरण युद्धपातळीवर - नगराध्यक्ष गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या साईंंच्या नगरीचा चेहरा-मोहरा धार्मिकते बरोबरच पर्यटनाभिमुख करण्यासाठी नगरपंचायतने शहरात विविध बगीचे विकसित करण्याबरोबरच रस्ते व चौकांच्या सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असल्याचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले.

नगराध्यक्ष श्री. गोंदकर यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय शिर्डी शहरातील रस्ते, वीज, पाणी, गटार आदी मूलभूत प्रश्न मार्गी लागल्यानंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ़ सुजय विखे पाटील यांनी शहराचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन शहर सौंदर्यीकरण व अन्य नागरी सुविधांवर लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यातूनच शहरातील महत्त्वाच्या जागा व रस्त्यांच्या चौकांच्या सुशोभिकरणाची कामे नगरपंचायतने हाती घेतली आहेत. नगर-मनमाड मार्गाला जोडणार्‍या कनकुरी रस्त्यालगत संत दासगणू महाराजांचे शिल्प बसवण्यात येणार आहे़.

याठिकाणी आकर्षक फुलझाडी, विद्युत रोषणाई, कला शिल्प, लॉन व भाविकांना सेल्फी काढण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे़ यासाठी साडेसतरा लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नगर-मनमाडपासून विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्याच्या मुखावर भव्य बोईंग विमानाचे शिल्प उभारले जाणार आहे़. या ठिकाणीही आकर्षक फुलझाडी, विद्युत रोषणाई, लॉन व भाविकांसाठी सेल्फी पॉईंट असणार आहे. यासाठीही चोवीस लक्ष रुपये अपेक्षित आहे.

याखेरीज 69.11 लक्ष रुपये खर्च करून नाला रस्तावरील स्वराज हॉटेल चौक, झुलेलाल मंदिरालगतचा चौक, कनकुरी रोडवरील श्रीराम चौक, विमानतळ मार्गावरील फायर स्टेशनचा चौक, नगर-मनमाड मार्गालगत आरबीएल बँक चौक, रिंग रोडवरील सीटी मार्केट चौक व पिंपळवाडी रोडवरील दत्तनगरचा चौक सुशोभित करण्यात येत आहे़

जागेच्या उपलब्धतेनुसार शहरात अन्य ठिकाणीही सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत़ यासाठी उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

Related Stories

No stories found.