
अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
इलेक्ट्रीक मशिनच्या सहाय्याने मावा तयार करणार्या ठिकाणी अन्न प्रशासन विभागाने छापा टाकला. शिंगवे नाईक (ता. नगर) येथे ही कारवाई केली आहे. याप्रकरणी काल एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद बिबन सय्यद (रा. शिंगवे नाईक) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे.
या कारवाईदरम्यान अन्न प्रशासनाने मशिन, तयार मावा असा 24 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जावेद सय्यद हा एका गाळ्यात व राहत्या घरामध्ये इलेक्ट्रीक मशिनच्या सहाय्याने मावा तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाली होती. सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे, शरद पवार, प्र.प.पवार, नमुना सहाय्यक कसबेकर यांच्यासह एमआयडीसी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
जावेद सय्यद हा इलेक्ट्रीक मशिनच्या सहाय्याने मावा तयार करून त्याची विक्री करत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. पथकाने 24 हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत सदरचे ठिकाण सील केले आहे. जावेद सय्यद विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 188, 273 व 179 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.