मावा निर्मिती करणार्‍या कारखान्यावर छापा

अन्न प्रशासनाची नवनागापूरमध्ये कारवाई
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील अन्न प्रशासनाने मंगळवारी (दिनांक 16 मे) दुपारी नवनागापूरमधील मनोरमा कॉलनीत मावा तयार करणार्‍या कारखान्यावर कारवाई केली. या प्रकरणी धनराज अनिल मासुळे (वय 24) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी फिर्याद दिली आहे. कारवाईमध्ये मावा तयार करण्याचे मशीन, सुपारी कटिंग मशीन, तंबाखू, तयार मावा, सुपारी, सुपारी चाळणी मशीन असा एकुण 67 हजार 505 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनोरमा कॉलनीतील साईनगर येथे धनराज अनिल मासुळे हा त्याने भाडोत्री घेतलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये तसेच सदर पत्र्याच्या शेडच्या समोर पडवीमध्ये फिटींग केलेल्या मशीनव्दारे तंबाखू व सुपारीपासून मावा तयार करीत असल्याची माहिती अन्न प्रशासनच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नमूद ठिकाणी कारवाई करून वरील मुद्देमाल जप्त केला आहे.

मासुळे विरोधात भादंवि कलम 328, 188, 273, 179 व अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com