मातुलठाण येथील पाण्याची चव अचानक बदलली

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती
मातुलठाण येथील पाण्याची चव अचानक बदलली

मातुलठाण |वार्ताहर| Matulthan

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील पाणी पुरवठ्याच्या विहिरीतील पिण्याच्या पाण्याची चव अचानक बिघडल्याने मुबलक पाणी असूनही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाण्यासाठी महिलांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ व महिला वर्गाचे हाल होत आहेत. याकडे गाव पुढार्‍यांनी लक्ष घालून उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मातुलठाण गोदावरीच्या कडेला असल्याने मोठ्या प्रमाणात येथे गोड पाणी आहे. गावात दोन विहिरी, तीन पाण्याच्या टाक्यांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पाणी भरपूर उपलब्ध असल्यामुळे गावात बरेच दिवसांपासून पाणी टंचाई नाही. नदीच्या कडेला ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजनेची विहीर आहे. या विहिरीला गोड पाणी आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून या विहिरीतील पाण्याची चव अचानक बदलल्याने पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी पिल्याने अनेकजण आजारी पडत आहेत. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गोड पाण्यासाठी महिलांवर धावपळ करण्याची वेळ आली आहे.

पाणीपुरवठ्याच्या विहिरीचे पाणी अचानक बदलल्याने गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अचानक पाणी बदलल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. विहिरी शेजारी वेताळ बाबा महाराजांचे मंदिर असून देवाची लीला असावी, अशी चर्चा आहे. ग्रामपंचायतीकडून याकडे डोळेझाक होत आहे. गावात आरो फिल्टर बसवण्याची गरज असताना गावातील एकही पुढारी लक्ष देत नाही. ग्रामस्थांना पाण्यासाठी शेजारील गोंडेगाव येथे जावे लागत आहे. त्यासाठी पाच किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. या प्रश्नाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिलावर्गाने दिला आहे.

उन्हाळ्याची दिवस असल्याने गावा गावत मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जेथे पाणी आहे तेथे क्षारयुक्त पाणी आहे. त्यामुळे अरो फिल्टर ची गरज आहे. या पाच गावाच्या अ‍ॅरो फिल्टर निधी उपलब्ध असुन त्यात काही तात्रिक अडचण आहे. यात आमदारांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

पाच गावांना माझ्या निधीतून अरो फिल्टर दिले आहे. पण मधल्या काळात सभापतीचा वाद न्यायालयात होता. सभापतींना काही अधिकार दिले नव्हते. आपण गावांना अ‍ॅरो फिल्टर मिळावे म्हणून पत्रव्यवहार केला आहे. तसेच ग्राम विकासमंत्री यांच्या सचिवांशीही पत्रव्यवहार केला आहे. पाच गावांच्या सरपंचांबरोबर चर्चा करून कसा मार्ग काढायचा, ते ठरवू.

- विजय शिंदे, पंचायत समिती सदस्य

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com