
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यातील ओबीसी, मराठा आणि आणि दुर्बल घटकातील मुलींसाठी पहिले शासकीय मातोश्री वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र सारथी, महाज्योती या संस्थंच्या पदाअधिकार्यांच्या हटवादी भूमिकेमुळे नाशिक विभागातील 200 मुली या वसतिगृहापासून वंचित राहणार असल्याचा आरोप महाज्योतीचे माजी संचालक दिवाकर गमे यांनी केला आहे.
याबाबत गमे म्हणाले, ओबीसी, मराठा आणि आणि दुर्बल घटकातील अनेक गुणवंत मुली, चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवूनही, आर्थिक स्थितीमुळे मोठ्या शहरात राहुन शिक्षण घेऊ शकत नाही. त्याला पर्याय म्हणून राज्यात शासनाची बंद पडलेली व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वसतिगृहांच्या ईमारतींमध्ये मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेला होता.
यातील राज्यातील सर्वात पहिले मातोश्री शासकीय वसतिगृह नाशिक विभागासाठी नाशिक शहरात सुरू करून यात 200 मुलींची सुविधा करण्याचा निर्णय शासनाने 21 एप्रिल 2022 च्या पत्रानुसार घेतला होता. यात 75 मुली ह्या महाज्योती संस्थेच्या ओबीसी , 75 मुली ह्या सारथी संस्थेच्या मराठा कुणबी तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 50 मुली, आर्थिक दुर्बल घटकातील घेण्याचा निर्णय झाला.
या वसतिगृहाचे लोकार्पण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते, नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री मा, छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे तत्कालीन मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थीतीत 24 एप्रिल 2022 ला संपन्न झाला. हे वसतिगृह सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महाज्योती व सारथी संस्थेला दिलेला असून, तो तसाच पडून आहे. या वसतिगृहाच्या प्रशासनाची व ते सुरू करण्याची जबाबदारी, मात्र सारथी पुणे या संस्थेला दिलेली होती.
हे वसतिगृह सुरू करण्यासाठी सारथी संस्थेकडून सतत आक्षेपांचीच मालीका सुरू होती. सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी या वसतिगृहाच्या शासन निर्णयावर वेळोवेळी आक्षेप घेत हे प्रलंबित ठेवण्याचे काम केले. तर महाज्योतीचे प्रशासकीय अधिकारी यांनी हात झटकल्याने शासनाचा या वसतिगृहाचा शासन निर्णय निघून तीन महिन्यांचा कालावधी झाला असताना सुध्दा, वसतिगृह सुरू करण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही.
सारथी व महाज्योतीच्या प्रशासकिय अधिकार्याच्या हटवादी भुमिकेमुळे नाशिक येथील 200 मुलींचे वसतिगृह सुरू होण्या ऐवजी ही योजनाच कायमची बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली असल्याचा आरोप दिवाकर गमे यांनी केला आहे.
.. तर आंदोलन
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळानकर, सारथीचे एम डी अशोक काकडे व महाज्योतीचे एमडी राजेश खवले यांना निवेदन देऊन, 15 जानेवारीपर्यंत मातोश्री वसतिगृह सुरू करण्याची रितसर जाहीरात द्यावी, अन्यथा 16 तारखेनंतर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, उपोषणाला बसणार आहे. असा इशारा दिवाकर गमे यांनी दिला आहे.