
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कल्याण मटका जुगार चालविणार्या तिघांवर तोफखाना, कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान सुमारे पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे बस स्थानकच्या भिंतीच्या आडोशाला विनोद बबनराव शेटे (वय 52 रा. वंजार गल्ली, रामचंद्र खुंट, नगर) हा लोकांना कागदावर अंक लिहून ते त्यांना देऊन पैसे घेऊन कल्याण मटका जुगार खेळताना व खेळविताना मिळून आला. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार सोमनाथ राऊत यांनी फिर्याद दिली आहे. माळीवाडा बस स्थानकच्या पाठीमागील बाजूला भिंतीच्या आडोशाला मंगेश हिरामन भोसले (वय 36 रा. जहागीरदार चाळ, बुरूडगाव रोड) हा लोकांना कागदावर अंक लिहून ते त्यांना देऊन पैसे घेताना मिळून आला.
पोलीस अंमलदार अमाले गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोसले विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. तोफखाना पोलिसांनी घासगल्लीमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर कारवाई केली. तेथे आसीफ कादर शेख (वय 48 रा. पिंजार गल्ली) हा मटका घेत होता. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार चेतन मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.