मातुलठाणसह गोदावरी पट्टयात पोकलँडच्या सहाय्याने वाळूचा उपसा

ग्रामस्थ दहशतीखाली; विरोध केल्यास गुंडाकडून धमक्या
मातुलठाणसह गोदावरी पट्टयात पोकलँडच्या सहाय्याने वाळूचा उपसा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील मातुलठाणह गोदावरी पट्टयात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू असून यंत्राच्या साह्याने उपसा करण्यास बंदी असताना

मोठमोठ्या पोकलॅन मशीनचा वापर करून वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू उपसा करणार्‍यांना गुंडांचे अभय असून ग्रामस्थ दहशतीखाली वावरत आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने वाळू तस्करांनी गावात उच्छाद मांडला आहे.

मातुलठाण परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज शेकडो वाहनातून वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू उपशासाठी सर्रास पोकलॅन मशीनचा वापर होत आहे. वास्तविक वाळू उपशासाठी अशा मशीनचा वापर करण्यास बंदी आहे, असे असताना मोठमोठे मशीन वापरून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी वाळू उपशास विरोध केल्यास त्यांना गुंडांकडून धमक्या दिल्या जातात. गुंडांनी गावात चेकनाका सुरू केला असून गावात ये जा करणार्‍या व्यक्तीची त्यांच्याकडून चोकशी केली जाते. नदीपात्राकडे जाण्यास ग्रामस्थांना प्रतिबंध केला जातो. गुंडांच्या धमक्यांमुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत.

प्रचंड प्रमाणात होत असलेल्या वाळू उपशाकडे स्थानिक प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. या परिसरात यापुर्वी वाळू तस्कर तसेच ग्रामस्थ यांच्यात चकमकी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता गुंडांचा सहारा घेतला आहे. त्यांच्यामार्फत ग्रामस्थांना धमक्या दिल्या जात आहेत. पोलिस व महसुल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गुंडांचा तसेच वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com