
नेवासा | तालुका प्रतिनिधी
गडचिरोली येथे तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली.
बंडु नवथर आणि श्रीकांत बेरड अशी मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अतिदुर्गम -संवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्याच्या बॅरकमध्ये ही घटना घडली आहे.
शहीद जवान बंडु बंशी नवथर (32 वर्षे) यांच्या पार्थिवावर शुक्रवार दि.3 जून रोजी सकाळी नेवासा तालुक्यातील पिंप्रीशहाली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय करे व त्यांचे टीमने रायफल मधून हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली.
या जवनाला अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. शोकाकुल वातावरणात ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी शहीद जवानाला अखेरची सलामी दिली.
शहीद बंडू नवथर यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये वृद्ध आई- वडील, पत्नी व एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पिंप्रीशहाली या त्यांच्या मूळ गावी वास्तव्यास आहे.
दरम्यान श्रीकांत बेरड आणि बंडु नवथर यांच्यामध्ये अंतर्गत वादातून भांडण झाले होते. रागाच्या भरात रायफलमधून श्रीकांत याने बंडूवर गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही दौंड पुणे येथील SRPF कॅम्पचे जवान होते. घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.