धारणगाव शिवारात नवविवाहितेचा मृतदेह आढळला

धारणगाव शिवारात नवविवाहितेचा मृतदेह आढळला

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील धारणगाव शिवारात दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या राणी किरण चंदनशिव यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने धारणगाव शिवारात खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना हुंडाबळीची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोपरगाव तालुका पोलिसानी महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून सासू , सासरे, नवरा, दीर, भाया आदींना ताब्यात घेतले आहे. चौकशीतून हत्या की आत्महत्या यावर प्रकाशझोत पडणार आहे .

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राणी चंदनशिव या तरुणीचे लग्न दोन महिन्यांपूर्वी धारणगाव येथील किरण चंदनशिव याचे बरोबर करोना काळात झाले होते. सदर तरुण नाशिक जिल्ह्यातील बजाज फायनान्स या खाजगी कंपनीत नोकरी करत असून त्यास नाशिक येथे राहण्यासाठी घर घेण्याची इच्छा होती. त्यातून त्याने पत्नीला माहेराहून पन्नास हजार रुपये आणावेत यासाठी दबाव आणला होता. यातून ही घटना घडल्याची माहिती धारणगाव परिसरातील नागरिकांत चर्चिली जात आहे.

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला आहे. माहेरची मंडळी अद्याप कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोहचली नव्हती ते आल्यावर काय भूमिका घेतात यावर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com