
टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील माजी सरपंच श्रीमती कालिंदी सुरेश घायतडक यांची विवाहित मुलगी पूजा हिचा नाशिक येथे संशयास्पद मृत्यू झाला. पती व सासूच्या त्रासाला कंटाळून पूजा हिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा रमेश पटेकर हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला. लग्नानंतर एक वर्षापासून सासरकडील लोक नको ते कारण पुढे करून पूजा हिला सतत त्रास देत होते. मुलीचे आई व भाऊ पुजाला भेटण्यासाठी नाशिकला जात असता मुलीची विचारपूस करायचे, मात्र वेळोवेळी पूजा ही आपल्यावर होणार्या त्रासाची कल्पना आई व भावाला देत होती. मात्र नंतर सासरचे लोक पूजाला लग्न होऊन तीन वर्षे झाली, मुलबाळ होत नाही हे कारण पुढे करून अधिक त्रास द्यायला लागले.
माहेरच्या लोकांनी पुजाचा नवरा, सासू व इतर नातेवाईकांना त्रास देऊ नका, असे वारंवार सांगितले. मात्र फारसा फरक पडला नाही. मागील सप्ताहात बुधवारी दुपारी एक वाजता पुजाच्या भावाला नाशिकहून फोन आला, पूजा गंभीर आजारी आहे. हे ऐकताच तिची आई कालिंदी घायतडक व मुलगा तात्काळ पुजाला भेटण्यासाठी नाशिकला गेले. तेव्हा पुजा दवाखान्यात मृत अवस्थेत दिसून आली.
माहेरच्या लोकांनी नाशिक पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पुजा हिचा भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 22 फेब्रुवारी 2023 रोजी 12:30 वा. सुमारास पुजा हिने लोखंडी गजास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सन 2021 पासून ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत माझी बहिण पुजा (रा. शिवनगर, निलगिरीबाग नाशिक) हिला तिचे पती रमेश विष्णू पटेकर व सासु सखुबाई विष्णू पटेकर यांनी वेळोवेळी तु वांझोटी आहे, तुला मूल बाळ होत नाही, असे बोलून तिला शारीरीक व मानसिक त्रास देऊन तिस शिविगाळ व मारहाण करून, तु माहेरून दाबेलीचे दुकान मोठे करायचे आहे या कारणासाठी 1 लाख रूपये घेऊन ये, अशी मागणी करून ती पुर्तता केली नाही म्हणून तिला त्रास दिला.
या त्रासास कंटाळून बहीण पुजा हीने राहत्या घरी लोखंडी गजास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावरून पोलिसांनी पती रमेश विष्णू पटेकर व सासू सखुबाई विष्णू पटेकर यांच्याविरुध्द भादंवि कलम 438, 306, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पूजा हिच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर घटनेची कसून चौकशी करून मयत विवाहित तरुणीसह तिच्या माहेरील लोकांना तात्काळ न्याय देण्याची मागणी कुटुंबियांसह एकलहरे तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार आजम जहागीरदार, पत्रकार लालमोहंमद जहागीरदार, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन नूरअहेमद जहागीरदार, गुलाब नवाब, अनिस जहागीरदार, ताज पटेल तसेच ग्रामस्थांनी केली आहे.