
लोणी |वार्ताहर| Loni
मला दुसरे लग्न करायचे आहे. आता मी अधिकारी होणार आहे, त्यामुळे तू मला शोभणार नाही, असे म्हणून पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून भाग्यश्री संदीप बाचकर (वय 28) या विवाहितेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गळनिंब येथील भाग्यश्री संदीप बाचकर ही विवाहिता सोमवारी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. परीसरातील नागरिकांनी शोधमोहीम सुरू केली असता काल मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कुरणपूर (ता. श्रीरामपूर) येथील वच्छलाबाई देठे यांच्या मालकीच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, श्री. कुसळकर यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर गळनिंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील तिचे माहेर असल्याने मोठ्या संख्येने नातेवाईक अंत्यविधीसाठी जमले होते.
दरम्यान, मयत भाग्यश्रीचा भाऊ दीपक भानुदास धुळगंड (वय 28) रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर यांनी लोणी पोलीस ठाण्यात भाग्यश्रीचा पती संदीप सखाराम बाचकर, रा. बाचकर वस्ती, गळनिंब, ता. श्रीरामपूर याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यात म्हटले आहे. की माझी बहिण भाग्यश्री हिचा पती संदीप याने मला दुसरे लग्न करायचे आहे. आता मी अधिकारी होणार आहे, त्यामुळे तू मला शोभणार नाही, तुला मोलकरीण म्हणून ठेवीन असे म्हणून भाग्यश्रीचा मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी आरोपी संदीप सखाराम बाचकर याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. 220/2023 भादंवि कलम 306, 323 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत.