पेमगिरीत विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पेमगिरीत विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

चारित्र्यावर संशय घेत एका 22 वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयत विवाहितेच्या पतीस पोलिसांनी अटक केली आहे.

रुपाली गितेश कोठवळ (वय 22, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत मच्छिंद्र महादू पडवळ (रा. कर्जुलेपठार, ता. संगमनेर) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2021 मध्ये रुपाली व गितेश यांचे लग्न झाले होते. रुपालीने आपल्या मनाप्रमाणे लग्न केले होते. त्यानंतर ती सासरी पेमगिरी येथे नांदत होती. दरम्यान लग्नाच्या दोन महिन्यानंतर गितेश हा रुपालीवर संशय घेवू लागला.

माहेरच्या लोकांशी देखील रुपालीला बोलू दिले जात नव्हते. त्यानंतरही रुपाली हीस वारंवार मारहाण होत होती. ‘तु माहेरील लोकांशी बोलते, तंबाखू अकोट लावते, म्हणून देखील तिला मारहाण होत होती. गितेश हा रुपालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या सर्व कारणावरुन रुपाली हिचा तिचा पती गितेश बाळासाहेब कोठवळ, सासरा बाळासाहेब रामभाऊ कोठवळ, सासू संगिता बाळासाहेब कोठवळ (सर्व रा. पेमगिरी, ता. संगमनेर) व मुलाचा मामा अनिल गोडसे, मामी लता ऊर्फ पुष्पा अनिल गोडसे (रा. गोडसेवाडी, ता. संगमनेर) यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. या कारणावरुन रुपाली हिने 31 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजता पेमगिरी येथे राहत्या घरामागील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली.

या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी वरील आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 113/2022 भारतीय दंड संहिता 306, 498 (अ), 323, 34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ठाकरे करत आहे. दरम्यान मयत विवाहीतेचा पती गितेश कोठवळ यास पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

Related Stories

No stories found.