आश्वी (वार्ताहर) -

चारित्र्याच्या संशयावरून वारंवार सासरी होणार्या छळास कंटाळून संगमनेर तालुक्यातील पिप्रीं-लौकी अजामपूर

येथील विवाहित महिला शारदा जयराम गिते हिने गुरुवारी रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात मयत शारदा हिचे वडील दगडू सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती जयराम चांगदेव गिते व भाया संतोष चांगदेव गिते यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, पती जयराम गिते व भाया संतोष गिते हे दोघे जण शारदा हिला लग्नानंतर एक वर्षापासून चारित्र्याचा संशय घेत किरकोळ कारणावरून वारंवार मारहाण करत होते. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2020 मध्ये महिलेने पती विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा नांदायला गेली होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने ती रुग्णालयात नोकरी करत होती. परंतु चारित्र्याचा संशय घेऊन तिला वारंवार शिवीगाळ व मारहाण करून नोकरी सोडण्यास भाग पाडले होते.

दोन दिवसांपूर्वी जावई व मुलगी दोघेही हाजरवाडी येथे भेटायला आले होते. यावेळी माझे पाय दुखत असल्याने जावई जयराम यांनी मुलगी शारदा हिला माझ्या सोबत दवाखान्यात जाण्यासाठी सोडून गेले होते. दुसर्या दिवशी दवाखान्यातून आल्यानंतर शारदाला नवीन मोबाईल फोन विकत घेऊन दिला व तिला सासरी पिंप्री-लौकी येथे सोडले होते. त्यामुळे रात्री 8.30 वा. मला जावई जयराम यांचा फोन आला की, तुम्ही शारदाला मोबाईल घेऊन दिला आहे का? मी हो म्हटल्याने आमच्या घरात दोन फोन आहेत, त्यामुळे तुमचा मोबाईल घेऊन जा असे म्हणाले. त्यामुळे चारित्र्याचा संशय तसेच नवीन मोबाईल फोन विकत घेतल्याचा राग मनात धरून किरकोळ कारणावरून शारदा हिला मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री शारदाने विषारी पदार्थ घेतला. तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे जयराम चांगदेव गिते व भाया संतोष चांगदेव गिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गाभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, गोपनीय विभागाचे विनोद गंभीरे, हवालदार शिंदे, रणधीर, पारधी, पो. ना. शेख, चालक पथवे आदी पोलीस कर्मचार्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.