बारागाव नांदूरमध्ये विवाहितेची छेड ; गुन्हा दाखल

बारागाव नांदूरमध्ये विवाहितेची छेड ; गुन्हा दाखल

राहुरी (प्रतिनिधी) / Rahuri - भेळ घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने एका 34 वर्षीय विवाहित महिलेचा पदर धरला व तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी त्या विवाहित महिलेचा पती व सासरा तिला सोडविण्यासाठी आले असता त्यांना मारहाण केल्याची घटना दि. 6 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे घडली.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे एक 34 वर्षीय विवाहित तरुणी घरात एकटी असताना आरोपी बाळासाहेब सुरेश ताठे रा. क्रांतीचौक, बारागाव नांदूर हा तेथे भेळ घेण्यासाठी आला होता. भेळ घेतल्यानंतर त्याने त्या विवाहित तरुणीस पिण्यासाठी पाणी मागितले. ती तरुणी पाणी आणण्यासाठी घरात जात असताना आरोपी बाळासाहेब ताठे याने तिच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. आणि घराच्या दरवाजात आडवा उभा राहून त्या तरुणीच्या साडीचा पदर ओढला. तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

यावेळी त्या विवाहित तरूणीने आरडाओरडा केल्यावर तिचे सासरे हे आरोपी ताठे याच्या ताब्यातून सोडविण्यासाठी तेथे आले. तेव्हा त्यांना लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यास सुरूवात केली व घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशी जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर विवाहित तरुणीचा पती आरोपीला समजावून सांगण्यास गेला असता आरोपी ताठे याने त्यालाही लाथा बुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. असे त्या विवाहित तरुणीने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आरोपी बाळासाहेब सुरेश ताठे याच्या विरोधात विनयभंग, मारहाण व जिवे मारण्याची धमकी देणे, आदी कलमांंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com