विवाहितेचा दिराकडून विनयभंग, पतीकडून मारहाण

पतीला पत्नीसह सासू-सासर्‍यांकडून मारहाण; परस्परविरोधी गुन्हा
विवाहितेचा दिराकडून विनयभंग, पतीकडून मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेचा दिराने विनयभंग केला. घडलेला प्रकार पतीला सांगितला असता पती, सासू-सासरे व दिराने विवाहितेसह तिच्या आईला मारहाण केली असल्याची घटना अहमदनगर शहरातील एका उपनगरात घडली. पीडित विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती, सासू-सासरे व दिराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विवाहितेच्या पतीनेही तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सासू-सासरे व पत्नीने मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी विवाहिता घरातील किचनमध्ये एकटीच असताना तिच्या दिराने किचनमध्ये प्रवेश करून विनयभंग केला. दिराने केलेला प्रकार विवाहितेने पतीला सांगितला. दुसर्‍या दिवशी सोमवारी दुपारी विवाहितेच्या पतीने घरामध्ये सर्वांना एकत्र बोलावून घेतले. त्यावेळी विवाहिता, तिचे आई-वडिल, पती, सासू-सासरे व दीर एकत्र जमलेले असताना विवाहिता व तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद विवाहितेने दिली आहे.

तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पत्नीसोबत वाद सुरू असताना तिने फोन करून तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. तिचे आई-वडिल माझ्या घरी आले असता, आमच्या मुलीचे पैसे का घेतले? आमचे पैसे देऊन टाका, असे म्हणून मला मारहाण केली असल्या0चे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.