
करंजी |वार्ताहर| Karanji
तिसगाव येथील नर्गिस इकबाल शेख हिचा गाडी घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केल्याची फिर्याद शेख यांनी पाथर्डी पोलिसांत दाखल केली आहे.
पीडित शेख हिच्या तक्रारीत एकबाल मेहबूब शेख राहणार विक्रोळीपार्क घाटकोपर मुंबई यांच्याशी नोव्हेंबर 2010 रोजी शेख यांचा विवाह झाला. त्यानंतर पुढील काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. दरम्यान एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्येही आहेत. त्यानंतर मात्र पती एकबाल शेख, इरफान महेबूब शेख, सना इरफान शेख, व नणंद शमीम अशीफ पठाण यांनी चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून घरात सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केला.
त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माहेरची परिस्थिती गरिबीची आहे. वडील हयात नाहीत. भावाची परिस्थिती जेमतेम आहे. मी पैसे आणू शकत नाही. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली. नंतर भावाला बोलावून घेतले आणि मला मुंबईहून तिसगावला घेऊन आला. काही दिवसांपासून माझ्या मुलीला व मुलाला सोबत घेऊन माझ्या भावाजवळ राहत आहे. त्यानंतरही तिसगावला येऊन सासरच्या लोकांनी तुला पैसे आणण्यासाठी पाठवले होते, काय झाले पैशाचे म्हणून त्रास दिला. कौटुंबिक समझोता व्हावा म्हणून नगर येथील भरोसा सेल तक्रार निवारण केंद्र यांच्याकडे लेखी अर्ज केला. परंतु चौकशीकामी संबंधित लोक हजर न राहिल्याने व ते नांदवण्यास तयार नसल्याने शेख हिने सासरच्या चार जणांविरोधात पाथर्डी पोलिसांत फिर्याद दाखल केली.