
संगमनेर | तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील जोर्वे येथील प्रवरा नदीपात्रात पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याची घटना २७ ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत मंगळवारी (ता.५) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जोर्वे येथील अरुण सोपान वाळके याचे दत्तात्रय किसन पवार यांची मुलगी मनीषा हिच्याशी विवाह झालेला होता. मात्र, अरुण याला दारुचे व्यसन असल्याने तो सतत मनीषा हिला त्रास द्यायचा आणि मारहाण करायचा.
या त्रासाला वैतागून मनीषा हिने प्रवरा नदीपात्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी मयत मनीषा हिचे वडील दत्तात्रय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी पती अरुण वाळके याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करत आहे.