
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पूर्ववैमनस्यातून टोळक्याने विवाहितेच्या घरामध्ये घुसून तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करून घरातील वस्तूंची तोडफोड केल्याची घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत घडली. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दीपक अर्जुन भोसले, राहुल उर्फ नाना साठे, सागर उर्फ भोळी अर्जुन भोसले, आकाश आल्हाट, लक्ष्मी अर्जुन भोसले, सोनू सागर भोसले, ज्योती साठे (सर्व रा. सिध्दार्थनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सोमवारी रात्री साडे आठ वाजता फिर्यादी व त्यांची मुलगी घरामध्ये असताना दीपक, राहुल, सागर व आकाश तेथे आले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून फिर्यादीला शिवीगाळ करत अश्लिल भाषा वापरली.
तोंड दाबून लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील संसारोपयोगी साहित्यांची तोडफोड करून घरासमोरील दुचाकीचे नुकसान केले. घराच्या बाहेर उभे असलेले लक्ष्मी, सोनू व ज्योती यांनी शिवीगाळ केली. दरम्यान हा प्रकार सुरू असताना फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले. सात जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.