
शेवगाव | शहर प्रतिनीधी
पाथर्डी तालुक्यातील जाट देवळे या गावातील १७ वर्षीय मुलीचे लग्न लावून देण्यात येत असल्याची माहिती निनावी फोनद्वारे उडान टीम आणि चाईल्ड लाईन हेल्पलाईन मिळताच त्यांनी तत्काळ शेवगाव पोलीस स्टेशन समन्वय साधून हा बालविवाह रोखला आहे .
आज शुक्रवारी (दि १६ ) सकाळी १२ :३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मुलीसह तिचे आई-वडील, नवरदेव मुलगा व त्यांचे आई वडील, नातेवाइकांना ठाण्यात बोलावून हा गुन्हा असल्याचे समजावून सांगितले. तसेच मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे त्यांच्याकडून लिहून घेतले. या १७ वर्षीय मुलीचा या लग्नाला विरोध असताना तिचे आई-वडील बळजबरीने लग्न लावून देत होते, अशी माहिती यावेळी सूत्रांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जाट देवळा येथील मुलाशी साखरपुडा आणि लग्न करण्याचा कार्यक्रम शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे नवरदेवाच्या नातेवाईकाच्या दारात होणार असल्याचे उडान टीम आणि चाईल्ड लाईनला समजले. हा बालविवाह रोखण्यासाठी उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानाचे समन्वयक, प्रवीण कदम आणि चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी शेवगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधत बालविवाह संबंधित सविस्तर माहिती दिली. माहिती मिळताच कोणताही विलंब न करता पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. के. धोत्रे आणि त्यांचे पथकाने मिळून बालविवाह रोखण्यासाठी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली.
पोलिसांनी मुलीसह आई-वडील नातेवाइकांना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करू नये, अशी त्याना नोटीस बजावली. त्याचबरोबर उडान टीम ने शेवगाव तालुक्यातील हातगाव, मंगळूर गाव आणि पाथर्डी तालुक्यातील जाट देवळा या तिन्ही ग्रामसेवकांसोबत समन्वय साधून या बालविवाह विषयक माहिती देऊन, हे बालविवाह प्रकरण बाल कल्याण समिती समोर सादर करण्या बाबत मार्गदर्शन केले.