बोहल्यावर जाण्यापूर्वीच मुलाला जेलची हवा!

नाट्यमय घडामोडींमुळे सैराट युवक-युवतीसह वर्‍हाडींना धक्का, राहाता तालुक्यातील घटना
बोहल्यावर जाण्यापूर्वीच मुलाला जेलची हवा!
File Photo

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या अल्पवयीन युवक-युवतीचे लग्न करून देण्याचे आश्वासन देऊन लग्न मंडपात बोहल्यावर चढण्यापूर्वीच मुलीच्या वडिलांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याने युवती बरोबर लग्नाचे स्वप्न पाहणार्‍या मुलाला बंदिस्त कोठडीची हवा खावी लागल्याने या नाट्यमय लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

राहाता तालुक्यात अल्पवयीन युवक- युवती सैराट झाले. त्यांचे प्रेम संबंध जुळल्याने त्यांना एकमेकांबरोबर संसार करण्याची इच्छा झाली. परंतु घरातील मंडळी या प्रेम संबंधाला विरोध करतील तसेच लग्न करून देणार नाही म्हणून या दोन्ही अल्पवयीन युवक- युवतीने घरातून पळून जाण्याची संकल्पना अंमलात आणली व दोन महिन्यांपूर्वी घरातील मंडळींना कुठलीही कल्पना न देता धूम ठोकली. घरातून मुलगा व मुलगी पळून गेली याची कल्पना दोन्ही घरातील कुटुंबियांना आल्यानंतर त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अनेकदा मोबाईलवर संपर्क करूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. हे दोघं अल्पवयीन असल्यामुळे त्यांना रजिस्टर विवाह करता येणार नाही याची कल्पना मुलीच्या कुटुंबियांना होती. तब्बल दोन महिन्यानंतर मुलीने तिच्या वडिलांना फोन करून संपर्क केला. संपर्क केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी तुमच्या दोघांचे लग्न लावून देतो

तुम्ही घरी या असे मुलीला विश्वासात देऊन सांगितले. घरचे लग्नाला तयार झाले ही बातमी युवकाला कळताच या दोघांनीचा आनंद गगनात मावेना असा झाला. या दोघांनी आपापल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघे आपापल्या घरी आले. मुलीच्या वडिलांनी मुलाला अद्दल घडावी यासाठी लग्न समारंभ नाट्याची पूर्ण तयारी करण्याचे ठरवले. मुलीच्या घरासमोर मंडप घालण्यात आला बँड पथक, भोजन व्यवस्था, पाहुणे मंडळीना निमंत्रण लग्नासाठी लागणार्‍या सर्व गोष्टींची तयारी केली.

आपले लग्न काही वेळातच होणार याची स्वप्न पाहणार्‍या नवरदेव व नवरीला या नाट्यमय लग्नाची कुठली प्रकारची शंका येणार नाही याची काळजी मुलीच्या कुटुंबीयांनी घेतली होती. मुला- मुलींनी लग्नासाठी पोशाख चढवला. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली. नवरदेव बोलल्यावर जाण्यापूर्वीच मुलीच्या घरच्या मंडळींनी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याने लग्न समारंभात बँड पथकाच्या मधूर संगीतात मग्न झालेल्या सर्व वर्‍हाडी मंडळी अचानक धक्का बसला. लग्नाचे स्वप्न पाहणार्‍या नवरदेवाला कोठडीची हवा खावी लागल्याने या नाट्यमय लग्न समारंभाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com